औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनियमिततेची चौकशी करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0
10

मुंबई, दि. 23 : औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये झालेल्या अनियमिततेची पंधरा दिवसात चौकशी करण्यात येईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.  सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

श्री.सामंत म्हणाले, औरंगाबाद येथील विद्यापीठातील अनियमिततेसंदर्भात स्वतः राज्यपाल यांची भेट घेतली असून या विद्यापीठासह इतर विद्यापीठातील अनियमिततेच्या संदर्भातही चर्चा केली आहे. कुलगुरु यांच्या हाताखालील अधिकारी, कर्मचारी यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. मात्र विद्यमान आणि माजी  कुलगुरु यांच्या विरोधात चौकशी सुरु करण्यापूर्वी विधी व न्याय विभागाचे मत विचारात घेतले जाईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील अनेक विद्यापीठांनी लेखा परिक्षण अहवाल सादर केले नसल्याचे सांगून श्री.सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठ, एस एन डी टी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर या विद्यापीठांनीही गेल्या काही वर्षांपासून लेखा परीक्षण अहवाल सादर केले नसल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

या विषयावरील झालेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, अंबादास दानवे आदिंनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here