कृषी प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरीकरिता पंधरवड्याचे आयोजन

0
3

औरंगाबाद, दि. 13 (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सुक्ष्म उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे. शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनासाठी सर्वकष मूल्य साखळी विकसित करण्यासाठी अर्थसाहाय्य करणे, या उद्देशाने 3 जानेवारी ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत कृषी प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरी पंधरवड्याचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना 2020 ते 25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यासाठी “ एक जिल्हा एक उत्पादन” या घटकांमध्ये मका या पिकाची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्क्यांपर्यंत व जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत प्रति प्रकल्पासाठी अनुदान देय असणार आहे. सामाजिक पायाभूत निर्मितीकरिता शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी शासन यंत्रणा किंवा खासगी उद्योगांना कर्जाशी निगडित पात्र प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के रक्कमेसाठी कमाल मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल व योजनेंतर्गत मार्केटिंग, ब्रँडिंग व पॅकेजिंगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम सहाय्य असेल. त्यासाठीची कमाल निधी मर्यादा विहित करण्यात येईल. प्रस्ताव एक जिल्हा एक उत्पादन धोरणानुसार मका पीक निश्चित केलेल्या उत्पादनाशी संबंधित असावा.
या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना ऑनलाईन अर्ज करण्याविषयी माहिती www.pmfme.mofpl.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क करावा, असेही त्यांनी कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here