जालना जिल्ह्यात
ॲनिमिया मुक्त गाव राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ

0
4

जालना, दि. 3 (प्रतिनिधी) – ॲनिमियामुळे अनेक आजारांना आंमत्रण मिळते. दैनंदिन जीवनात जर पोषक आहार व योग्य उपचार घेतल्यास ॲनिमियापासून निश्चितपणे बचाव होऊ शकतो. या आजारापासून आपल्या कुटुंबासोबत आपले संपूर्ण गावच ॲनिमियामुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी करावा. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ॲनिमिया मुक्त गाव मोहिमेची प्रभावीपणे जनजागृती करावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विदयमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त जालना तालुक्यातील विरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आज आयोजित कार्यक्रमात ‘ॲनिमिया मुक्त गाव राज्यव्यापी मोहिमे’चा शुभारंभ श्री. टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जालना जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते आदींसह आशा-अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.
माविमच्या सहयोगातून ॲनिमिया मुक्त गाव राज्यव्यापी मोहिमेचा आजपासून शुभारंभ होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून श्री. टोपे म्हणाले की, ॲनिमिया हा आजार शरीरात कमी हिमोग्लोबिनचे प्रमाण असल्यावर होतो. बालकांपासून ते वयस्कांपर्यंत सर्वांनाच हा आजार होऊ शकतो. यासाठी सर्वांनीच विशेषत: महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ॲनिमिया हा आजार होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजावेत. पुरेसा पोषण आहार, व्यायाम, योगासने यावर भर दयावा. आहारात जास्तीतजास्त लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रात वेळोवेळी आपल्या रक्ताची तपासणी करुन हिमोग्लोबिनचे प्रमाण जाणून घ्यावे. कमी असल्यास वेळीच औषधोपचार घ्यावेत. सर्व शासकीय रुग्णालयात रक्ताची तपासणी मोफत केल्या जाते. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या अनेक आरोग्याच्या योजना आहेत, त्याचाही सर्वसामान्यांनी लाभ घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवावे.
कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत आवाहन करताना श्री. टोपे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कोविड लस ही प्रभावशाली आहे. ज्यांनी अदयाप लस घेतली नाही, त्यांनी तातडीने लस घ्यावी. आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. या वयोगटातील आपल्या मुलांना लस घेण्यासाठी जरुर सांगावे. उदया दि. 4 जानेवारी ते 11 जानेवारी 2022 या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने जालना येथे महाशस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. माविमच्या कार्याबददल बोलताना ते म्हणाले की, माविममुळे सर्वसामान्य महिला आर्थिकदृष्टया सक्षम झाल्या आहेत. जिल्हयात माविमच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
श्रीमती ठाकरे म्हणाल्या की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविम निरंतर कार्य करते. याबरोबरच महिलांना आरोग्याची शिस्त लागावी, याकरीता ॲनिमिया मुक्त गाव राज्यव्यापी मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे माविमने ठरवले आहे. खरंतर महिला ही कुटुंबाचा महत्त्वाचा आधार आहे. घरातली स्त्री आजारी पडली तर संपूर्ण कुटुंबाचे दैनंदिन काम थांबते. त्यामुळे स्वत: महिलांनी प्राधान्याने आपल्या आरोग्याकडे लक्ष दयावे. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून नियमितपणे पोषक आहार घ्यावा. आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. वेळच्यावेळी तपासण्या करुन घ्याव्यात.
श्री. जिंदल म्हणाले की, ॲनिमिया मुक्त गाव मोहिमेची सुरुवात प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून करावी. घरातील लहान मुलं आणि महिलांनी पोषण आहाराचे सेवन करावे. आरोग्य केंद्रांत हिमोग्लोबिनची तपासणी करुन घ्यावी. आपल्या परसबागेत लोहयुक्त भाज्या लावाव्यात. यासाठी जिल्हयात लवकरच परसबाग मोहिमही सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. खोतकर म्हणाले की, महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने ॲनिमियामुक्त गाव मोहिम महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपले गाव, शहर, जिल्हा ॲनिमिया मुक्त करावे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ॲनिमिया विषयक माहितीपत्रकांचे विमोचन करण्यात आले. आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ श्री. टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास विरेगावचे सरपंच अमोल जाधव, तसेच सर्वश्री दिलीप भूतेकर, पंडितराव भूतेकर, विश्वभंर भूतेकर, भगवान नाईकनवरे, भरत कदम, गणेश कदम, मधुकर मोरे, भगवानराव घाटुळ, सुभाष बागल, रामदास म्हस्के, पंडित मगर, शिवाजी भूतेकर, रावसाहेब मोहिते, अशोक देशमुख, सोपान घाटे, देवराव गायकवाड, पांडुरंग उबाळे, तुकाराम कदम, दत्ता भूतेकर, रामेश्वर भूतेकर, गजानन शिंदे, सतीष कोरगावकर, शिवाजी खेडेकर, ज्ञानेश्वर काकडे, मनीभाऊ उडदु:खे, गजानन शिंदे, सतिश कोरगावकर, शिवाजी खेडेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here