जालना जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास 1098 क्रमांकावर वर माहिती द्या
बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी संवेदनशिलतेने प्रयत्न करण्याची गरज
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

0
4

जालना, दि. 31 :- जालना जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी संवेदनशिलतेने प्रयत्न करण्याची गरज आहे. बालविवाह रोखण्याबाबत जनमानसांमध्ये सर्वदूर जनजागृती करण्याबरोबरच जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास त्याची माहिती 1098 या क्रमाकांवर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
जिल्हा बाल संरक्षण विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात त्रैमासिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.एन. चिमिंद्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी (मा) कैलास दातखीळ, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. मनोहर बन्सवाल, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गजानन इंगळे, चाईल्ड लाईनचे माधव हिवाळे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमित घवले बालकल्याण समितीच्या सदस्या श्रीमती अश्विनी लखमाले, ॲड मेघना चपळगावकर, ॲड अनिता शिऊरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, जालना जिल्ह्यात वर्षभरात 52 बालविवाह रोखण्यात बालकल्याण समितीला यश आले आहे. जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये यासाठी समाजातील प्रत्येकाने सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रामीण भागामध्ये बालविवाह रोखण्यासाठी जनमानसांमध्ये जाणीवजागृती होण्याची गरज असुन गावात कोठेही बालविवाह होऊ नयेत यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची यामध्ये महत्वपूर्ण जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लग्नाच्यावेळी धार्मिक गुरुंनी वयाची शहानिशा न करता लग्न लावु नये. लग्न करणारे हे अल्पवयीन आढळल्यास धार्मिक गुरुंवर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी चर्चाही या बैठकीमध्ये झाली.
बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावरही समित्यांच्या स्थापना करण्यात आली असुन तालुकास्तरावरील बैठकाही नित्यनेमाने व्हाव्यात या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना करत लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण होण्यासाठी पोस्के कायदा करण्यात आला असुन याअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांची तसेच महिलांवरील अत्याचारासंदर्भात दाखल गुन्ह्यांची माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यांनी समितीला तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी जिल्हा कृतीदलाचे कामकाज, बालसंरक्षण विषयक कामकाज, बालगृह, संस्थेचे काम, बालकांसंदर्भात काम करणाऱ्या संस्था, बालकल्याण समिती, बालन्याय मंडळ, सामाजिक तपासणी अहवाल, समुपदेश, दत्तक विधान, ग्राम, तालुका व प्रभाग, जिल्हा बाल संरक्षण समितीचे कामकाज आदी विषयावंरही विस्तृत आढावा घेतला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here