तेरापंथ महिला मंडळातर्फे नीवी तप अनुष्ठान व अनेकांतवादावर कार्यशाळा

0
10

व्यसनमुक्तीतील फेलोशिपबद्दल डॉ. सुरज सेठीया यांचा सत्कार

जालना/प्रतिनिधी – जालना तेरापंथ महिला मंडळाच्यावतीने निवी तप व अनेकांतवाद या विषयावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी व्यसनमुक्तीत फेलोशिप करणारे मराठवाड्यातील पहिले डॉक्टर ठरल्याबद्दल डॉ. सुरज राजेश सेठीया यांचा तेरापंथ महिला मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगीता बोथरा ह्या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून मंडळाच्या संघरक्षिका श्रीमती रतनीदेवी सेठिया, श्रीमती उषाबाई सेठिया, प्रमुख वक्ते उपासक पवन सेठिया, उपासिका सौ. अनीता जोगड यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रवक्ते पवन सेठीया व सौ. अनिता जोगड यांनी अत्यंत सोप्या भाषेत उदाहरणांद्वारे अनेकांतवाद काय आहे, हे समजावून सांगत अनेकांतवाद जाणून घ्या, त्याप्रमाणे व्यवहार करा, हट्ट धरू नका, सर्वांचे ऐका व समजून घ्या, आजच्या युगात ते अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला उभयतांनी मार्गदर्शन करताना दिला. मंडळाच्या संघरक्षिका श्रीमती उषाबाई सेठिया यानी नीवी तपाचे महत्व सांगून हे तप कसे करावे, याची माहिती दिली.
मानसोपचार तज्ञ डॉ. सूरज सेठिया हे व्यसनमुक्ती या क्षेत्रात फेलोशिप करणारे मराठवाड्यातील एकमेव डॉक्टर ठरल्याबद्दल तेरापंथ महिला मंडळाच्यावतीने शाल, तेरापंथ सभाद्वारा साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. अनिल संचेती यांनी डॉ. सूरज सेठीया यांचा परिचय दिला. एड्. अभयकुमार सेठिया यांनी डॉ. सूरज यांचे अभिनंदन करून आपण असेच यशाचे शिखर पादाक्रांत कराल, अशी सदिच्छा दिली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती डॉ. सूरज सेठीया आपण व्यसनमुक्तीवर कसे कार्य करीत आहे, याची माहिती दिली. आजच्या काळात फक्त बीड़ी, सिगरेट, अफीम, गांजा हेच व्यसन राहिलेले नसून, मोबाईलचे व्यसन लहानापासून मोठयांनाही जडत चालले आहे. येणाऱ्या काळात हे व्यसन गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असल्यामुळे लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवावें; अन्यथा परिस्थिती भयंकर बनेल, अशी भीती व्यक्त करून त्यांनी मंडळाचे आभार व्यक्त केले.
या कार्यशाळेत प्रारंभी साध्वी प्रमुख कनकप्रभाजी यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 41 महिलांनी नीवी तप अनुष्ठान करुन अभिवंदना प्रेषित केली. कार्यक्रमाची सुरुवात युवतीं मंडळाच्या मंगलाचरणाने झाली. त्यानंतर मंडळाच्या महिलांनी प्रेरणा गीत गायले. प्रास्ताविकपर भाषणात सौ. संगीता बोथरा यांनी सर्वांचे स्वागत करून मातृह्रदया साध्वीप्रमुख कनकप्रभाजींना ४१नीवी तपाची भेट समर्पित करून अभिष्टचिंतन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना सेठिया यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार सौ. संध्या सेठिया यांनी मानले. या कार्यशाळेत तेरापंथ महिला मंडळाच्या पदाधिकारी सदस्य समाजातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here