प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक बळकट करावी
— पालकमंत्री राजेश टोपे

0
2

कोविड-19 च्या क्लिनिकल मॅनेजमेंटच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन
जालना दि. 14 (प्रतिनिधी) — कोविड-19 च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा आरोग्य विभागाने सक्षमपणे सामना केला. या काळात रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना अनेक अनुभवही मिळाले. याचा फायदा कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होताना दिसत असला तरी डॉक्टरांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक बळकट करावी, अशी सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली.
ससून रुग्णालय यांचे सौजन्य व आयसीआयसीआय फाऊंडेशन यांच्या सामाजिक दायित्व निधीतून आयोजित कोविड-19 च्या क्लिनिकल मॅनेजमेंटच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन श्री. टोपे यांच्या हस्ते आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील टेलीमिडीसीन विभागात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. नीलिमा केरकेट्टा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले आदींसह आयसीआयसीआय फाऊंडेशनचे अधिकारी उपस्थित होते. या ऑनलाईन प्रशिक्षणात आरोग्य विभाग व खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर्स सहभागी झाले होते.
श्री. टोपे म्हणाले की, कोविड-19 या रोगामुळे आरोग्य विभागासमोर सुरुवातीला मोठे आव्हान उभे ठाकले होते. या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत घेतली. वेगवेगळया उपचार पध्दतीचा अनुभव कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत डॉक्टरांना मिळाला. म्युकरमायकोसिस सारखे गंभीर आजारही समोर आले. विविध औषधोपचार आणि ऑक्सिजनचा मोठया प्रमाणात करण्यात आलेल्या वापरातून रुग्णांना जीवदानही मिळाले. या सर्व गोष्टी केवळ प्रयत्नातून आणि सातत्याने अभ्यासातून डॉक्टरांना करणे शक्य झाले. परंतु कोविडसारख्या गंभीर संसर्गजन्य आजारावर आरोग्य विभाग व खाजगी रुगणालयांतील डॉक्टरांना योग्य उपचार करणे शक्य व्हावे तसेच उपचारातील त्रूटी दूर करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज होती. आयसीआयसीआय फाऊंडेशनने सामाजिक दायित्व निधीतून आयोजित केलेले हे प्रशिक्षण डॉक्टरांना निश्चितच लाभदायी ठरणारे आहे. जालना जिल्हयातील डॉक्टरांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कोविड रुग्णांना उत्तम उपचार सुविधा दयाव्यात, असे आवाहनही श्री. टोपे यांनी यावेळी केले.
अंबड येथे टेलिमेडीसीन सपोर्टसह डिजिटल इंटिग्रेटेड हेल्थ किओस्कचा शुभारंभ
आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या टेलिमेडीसीन सपोर्टसह डिजिटल इंटिग्रेटेड हेल्थ किओस्क प्रणालीचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. निलिमा केरकेट्टा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, गौरव बुटाला आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. टेलिमेडीसीन सपोर्टसह डिजिटल इंटिग्रेटेड हेल्थ किओस्क हे त्यापैकीच एक आहे. ग्रामीण भागात असलेल्या रुग्णांना टेलिमेडीसीनच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार देण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त आहे. या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून रक्तामधील साखर, उच्च रक्तदाब तसेच प्रयोगशाळेमध्ये करण्यात येणाऱ्या चाचण्या या ठिकाणी करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या प्रणालीच्या माध्यमातून तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेली औषधीसुद्धा या ठिकाणी बसवण्यात आलेल्या मेडीसीन डिस्पेन्सरीद्वारे मोफत उपलब्ध होणार आहे. जनतेने या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करुन डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, अंबड येथील मत्स्योदरी विद्यालयात उच्च दर्जाच्या शैक्षणिक सामग्रीसह ई-लर्निंग डिजिटल क्लासरुमचा शुभारंभही पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here