महिलादिनी संघर्षशील महिलांचा सत्कार भाजप सांस्कृतिक सेलचा उपक्रम

0
34


जालना, प्रतिनिधीः
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने शहरातील संघर्षशील महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. रामतीर्थ स्मशानभूमी, पेट्रोल पंप, कारखान्यात नोकरदार, छोटा व्यवसाय चालवून या महिलांनी जीवनात हार न मानता संघर्ष करून आज कुटुंबाला स्थिरता दिली आहे. या महिलांचे कौतुक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे भाजप सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे यांनी सांगितले.
कोरोनाचे नियम,अटी,पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रातिनिधिक स्वरुपात काही ठळक प्रेरणादायी झुंजार व्यक्तीमत्वाच्या महिला निवडल्या.त्यांचा कामाच्या ठिकाणी जाऊन सत्कार ,कौतुक करण्यात आले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक दामिनी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव यांच्या सत्कारापासून हा सोहळा सुरू झाला. पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणार्‍या,पतीच्या निधनानंतर वा पती अंथरुणावर खिळून राहण्याने कधीही घराबाहेर न पडलेल्या पण आता कंपनीत कंपनीचा गणवेष घालून काम करणार्‍या महिलांनी सांगितलेली कथा मनावर चटका लावून जाते. किराणा दुकान, गिरणी, पार्लर चालवणार्‍या रणरागिणींचा सत्कार करून एक वेगळेच समाधान मिळाल्याचे भाजप सांस्कृतिक सेलच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. नौकरी सोडून श्‍वान प्रशिक्षण घेऊन आलेली आणि सध्या तोच व्यवसाय स्वीकारून धडाडीने वेगवेगळ्या श्वानांना आज्ञा पाळायला लावणारी मृगनयनी मोहरीर असो अथवा रामतीर्थ स्मशानभूमीत राहणार्‍या पतीच्या कामाला साथ देत तेथे राहायला गेलेल्या, आता पतीच्या निधनानंतर तिथेच राहून अंत्यविधीचे पवित्र काम आनंदाने करणार्‍या काशीबाई पांडव यांच्यासह इतर महिलांचा अभुवन ऐकून संघर्षामुळे खचून न जाता त्यांनी नवीन उमेद निर्माण केल्याचे जिल्हाध्यक्षा देशपांडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे, आनंदी अय्यर, अरूणा फुलमामडीकर, दीपाली बिन्नीवाले, अर्पणा राजे, संपदा कुलकर्णी, शिल्पा मोतीयले यांच्यासह सांस्कृतिक सेलच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या महिलांचा झाला सत्कार
नगरसेविका संध्या देठे, पल्लवी जाधव(दामिनी पथक प्रमुख),पार्वती मोरताडे ( कारखान्यात काम करतात.) रेखा नरवैय्ये,(किराणा दुकान).भाग्यश्री जळगावकर (गृहिणी), मृगनयनी मोहरीर (श्‍वान प्रशिक्षक), रेखा घुले, श्रद्धा घोरपडे, सीमा घोडे, अर्चना जाधव(पेट्रोलपंपावर काम करतात) ज्योती पळसखेडकर ( कांडप,गिरणी) सुनीता पालकर ( ब्युटी पार्लर) काशीबाई पांडव ( रामतीर्थ स्मशान भूमी) दीपा बिनीवाले ( कारसेवक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here