रखडलेल्या ड्रायपोर्टच्या कामाला गती देण्यासाठी लवकरच निर्णय- गडकरी

0
13

निर्यातक्षम स्टील, कृषी साहित्य, किराणा, सोयाबीन-कॉटन डीओसी, फळ, भाजीपाल्याचे क्षेत्र आणि उत्पादनाची माहिती शिष्टमंडळाने केली सादर


जेएन पीटीचेअधिकारी लागले कामाला-डॉ. सुयोग कुलकर्णी
आम्ही उद्योजक आणि व्यापार यांची निवेदने तसेच निर्यातक्षम उत्पादने लागवड क्षेत्राची संकलित माहिती घेऊन दिल्लीला पोहोचलो, त्यावेळी जालन्यासह इतर ठिकाणच्या ड्रायपोर्टबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घटक सुरू होती. बैठकीनंतर त्यांनी आम्हाला चर्चेसाठी लगेच वेळ दिला. याप्रसंगी आम्ही संकलित माहिती सादर केल्यानंतर जेएनपीटीचे अधिकारी कामाला लागल्याचे डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी सांगितले.


मुदतबाह्य किटकनाशके कंपनीने परत घेण्याची तरतूद व्हावी- लढ्ढा
विक्रेत्याकडे मुदतबाह्य कीटकनाशक औषधांचे साठयांची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्याने मुदतबाह्य कीटक नाशकांचा विक्रेत्याकडील विक्री न झालेला शिल्लक साठा विक्री केंद्रामध्ये ठेवल्यास अशा मुदतबाह्य औषधे विक्री केंद्रात कृषि साहित्य खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचे आरोग्यास घातक होण्याची शक्यता विचारात घेऊन अशी मुदतबाह्य किटकनाशके संबंधीत उत्पादक कंपनीने विक्रेत्याकडून त्वरीत परत जमा करून घेणेबाबत केंद्रीय कृषि विभागाकडुन नियमाद्वारे तरतुद व्हावी, अशी मागणी यावेळी अतुल लढ्ढा यांनी ना. गडकरी यांच्याकडे केली.

जालना/प्रतिनिधी* – गेल्या 4 ते 5 वर्षांपासून रखडलेल्या जालना येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती देण्यासह तो शक्य तेवढ्या लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसात धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती त्यांना काल मंगळवारी (तारीख 21) भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे सचिव डॉ. सुयोग कुलकर्णी आणि महाराष्ट्र कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अतुल लढ्ढा यांनी दिली.
पाच वर्षापूर्वी जालना येथे निर्यातीच्यादृष्टीने ड्रायपोर्ट या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात येऊन संपादित 500 एकर जागेवर कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत अंतर्गत रेल्वे लाईन, सिविल वर्क आणि समृद्धी महामार्गाची जोडणीशिवाय काम पुढे सरकलेले नाही. त्यामुळे जालन्यातील उद्योजक आणि व्यापारी यांच्या शिष्टमंडळाने 15 दिवसापूर्वी लातूर येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन रखडलेल्या या प्रकल्पाला गती देण्याचे साकडे घातले होते. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ड्रायपोर्टवरून निर्यात होऊ शकणाऱ्या स्टील, कृषी साहित्य, किराणा, सोयाबीन – कॉटन डीओसी, फळ, भाजीपाल्याचे क्षेत्र आणि उत्पादनाची माहिती संकलित करून सादर करण्याबाबत सुचवले होते. त्या अनुषंगाने संकलित माहिती आणि जालना स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, व्यापारी महासंघ माफदा पुणे, डाळिंब महासंघ, मोसंबी महासंघ आदीं संबधित घटकांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन डॉ. सुयोग कुलकर्णी आणि अतुल लड्डा यांनी नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या आधिकार्‍यांच्या उपस्थितीत उभयतांनी संकलित माहिती सुपूर्द करून ड्रायपोर्टचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण होणे किती गरजेचे आहे, हे निदर्शनास आणून दिले. ना.गडकरी यांनी त्यांचे म्हणणे आणि समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या. दुपारीच जालना व इतर ठिकाणच्या ड्रायपोर्टबाबत बैठक घेतल्याचे सांगून जालन्याच्या रखडलेल्या ड्रायपोर्टच्या कामाला गती देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही देत सकारात्मक प्रतिसाद दिला.
गेल्या काही वर्षांपासून जालन्यातील उद्योजक, व्यापारी, फळ उत्पादक आपली विविध उत्पादने विकसित आणि विकसनशील देशांमध्ये निर्यात करत आहेत. जालन्यातील या क्षेत्रातून निर्यात करण्याची क्षमता खूप जास्त आहे, कारण या जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय ग्राहकांची गुणवत्ता पूर्ण केली जाते. जालन्यातून निर्यातीची उच्च क्षमता असतानाही, अनेक लॉजिस्टिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सुविधेसाठी जेएनपीटीचे ड्रायपोर्ट मंजूर झाले असलेतरी ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. कार्यान्वित झाल्यास जालन्यातील निर्यात आणि आयात व्यापार निश्चितपणे सुरळीत होईल, अन्यथा स्टील, फळबाग कृषी साहित्य आणि उद्योगाची क्षमता कमीच राहील. ड्रायपोर्टवर चालणारी एक मल्टी-मॉडेल वाहतूक पायाभूत सुविधा सर्व क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, सिड्स, किराणा, स्टील, दालमील ऑईल मील, कॉटन केक,कृषी, फळे यांचे जास्त प्रमाणात जालना जिल्ह्यात उत्पादन आहे. जालना व बुलढाणा दोन्ही जिल्ह्यात बी- बियाणे ऊत्पादन होत आहे, कमीत कमी ३० भारतीय व परदेशीय कंपनी ह्या परीसरामध्ये तब्बल वीस हजार शेडनेटमधुन मिरची, टोमॅटो, ढोबळी मिरची, कांदा ईत्यादी चे हायब्रीड बियाणे ऊत्पादन करुन भारतात तसेच भारताबाहेर पाठवितात, त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी ड्रायपोर्टचा फायदा होणार आहे. हे वाहतुकीचे आधिक कार्यक्षम मॉडेल बनणार असून, याबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः सर्वात जास्त फायदा फळ उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. संपूर्ण भारतात जालना शहर हे व्यापा-यांची नगरी म्हणून प्रसिध्द आहे. जालना जिल्हयात मोठमोठे उद्योगधंदे व कंपनी याव्यात, जालना जिल्हयाच्या व्यापारास चालना मिळावी व जालना जिल्हयाचा सर्वागीण विकास व्हावा याकरीता जालना येथील ड्रायपोर्टची प्रलंबीत कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती सुयोग कुलकर्णी आणि अतुल लड्डा यांनी जालना येथील व्यापारी उद्योजक फळबाग उत्पादकांच्यावतीने केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच ड्रायपोर्ट च्या कामाला गती देण्यासाठी नियोजनबध्द आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असा शब्द नितीन गडकरी यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here