रोटरीचा शस्त्रक्रिया महाशिबीराचा पथदर्शी प्रकल्प राज्यभर राबविणार- आरोग्यमंत्री टोपे

0
8

आतापर्यंत 330 शस्त्रक्रिया पूर्ण- रो. डॉ. सुमित्रा गदिया

जालना/प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि रोटरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध असाध्य आजारावर मोफत शस्त्रक्रिया महाशिबीर आयोजनाची संकल्पना यशस्वी ठरत असून, रोटरीसारख्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अशा महाशिबिरांचे आयोजन पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यभर केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज सोमवारी (ता. 10) येथे केले.
महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, रोटरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ ते 11 जानेवारीपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया शिबिर सुरू आहे. या शिबिरात मोतीबिंदू, पोटदुखी संबंधित, गुदद्वार, योनीमार्गाद्वारे रक्तस्त्राव, दातांचे उपचार, कान फुटणे, सुजणे, अस्थीव्यंग, मुतखडा, गर्भपिशवी इत्यादी शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांकडून मोफत करण्यात येत आहेत. गेल्या 7 दिवसात 330 यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शिबिरासाठी नाव नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच समारोप केला जाणार आहे. सुमारे 700 शस्त्रक्रिया या शिबिरात केल्या जाणार आहेत. ना. राजेश टोपे यांच्या सहकार्यामुळेच हे शिबिर नियोजनबद्धरीतीने आणि यशस्वी होत असल्याने रोटरी परिवाराच्यावतीने सहाय्यक प्रांतपाल डॉ. सुमित्रा गादिया, प्रकल्प प्रमुख डॉ. माधव आंबेकर, रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष महेंद्र बागडी, संजय राठी, सचिव अरुण मोहता, डॉ. राजीव जेथलीया, रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष एड. महेश धन्नावत, डॉ. नितीन खंडेलवाल, राजकुमार रुणवाल, अंबडचे डॉ. रोहित भाला, सागर कावना, श्रीकांत दाड आदी पदाधिकारी-सदस्यांनी ना. टोपे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ना. टोपे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य जनतेचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. असाध्य रोगावरील शस्त्रक्रियाही मोफत केल्या जातात. रोटरीसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजित महाशस्त्रक्रिया शिबिरात मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होत आहेत. त्यासाठी गाव पातळीपर्यंत जनजागृती करण्यात येऊन रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येत आहेत. रोटरीच्या संकल्पनेतून होत असलेल्या या शिबिराची यशस्विता पाहता राज्यभर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अशी महाशस्त्रक्रिया शिबिरे पथदर्शी प्रकल्प म्हणून आयोजित करण्याला प्राधान्य राहील, अशी ग्वाही देत, रोटरी परिवारासह खाजगी डॉक्टरांचेही सहकार्य लाभत असल्याने हेमा शिबिर यशस्वी होत असल्याचे सांगून त्यांनी आभार व्यक्त केले.
सहाय्यक प्रांतपाल डॉ. सुमित्रा गादिया म्हणाल्या की, जागतिक पातळीवर काम करणाऱ्या रोटरीच्यावतीने भारतासह परदेशातही मोफत शस्त्रक्रिया शिबिरे घेतलेली आहेत. असेच महाशिबीर जालन्यातही घ्यावे, अशी संकल्पना आम्ही ना. टोपे यांच्यासमोर मांडली असता, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिबिराचे आयोजन केले आणि त्यांचे वैयक्तिक लक्ष असल्याने त्यांनी येणाऱ्या अडचणी आणि समस्या दूर केल्याने हे शिबिर यशस्वी होत आहे. या महाशिबिरात येत्या दोन- तीन दिवसात नाव नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया होणार असून, एकूण संख्या 700 च्या जवळपास असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी रोटरी परिवारासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोडके, डॉ. गौरीशंकर चव्हाण, डॉ. रामेश्वर साबळे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सागर गांगवाल, डॉ. संजय जगताप यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, खाजगी डॉक्टर अथक परिश्रम घेत आहेत, अशी माहिती जालना रोटरी क्लबचे अध्यक्ष महेंद्र बागडी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here