शेतकरी विधवांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता भाऊबिजेला ओवाळणीत दिलेला शब्द संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी पाळला

0
22
Collector Sandip Kadam


भंडारा दि.16- आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भाऊबीज आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली होती. विधवा बाहिनींनी त्यांना ओवाळले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ओवाळणीत काय हवे असे विचारले. तेव्हा त्यांनी आपल्या प्राथमिक समस्या सोडविण्याची विनंती केली. त्या सर्व प्राथमिक समस्या सुटल्या असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. संवेदनशील मनाचा प्रत्यय या घटनेतून जिल्हावासीयांना आला.
शहापूर जवळ असलेल्या गोपीवाडा येथील जगदीश वाडीचर या तरुण शेतकऱ्यांने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीवर जणू आभाळच कोसळले होते. श्रीमती चंदा यांच्याकडे जिल्हाधिकारी भाऊबीजला गेले असता वारसा हक्काने मिळालेल्या सात बारा वेगळा करून देणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देण्यात येणाऱ्या निधी मधून असलेली मुदतीठेव गरजेनुसार वापरण्यासाठी रोखीने उपलब्ध करुन दिली व बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याबाबत चर्चा झाली होती. या सर्व त्यांना देण्यात आल्या असून त्यांच्या मुलांना पुढील महिन्यापासून बाल संगोपन योजनेतून 425 रुपये प्रतिमाह लाभ देण्यात येणार आहे. सातबारा वेगळा करून देण्याचे महत्वाचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने झाले आहे.
लाखनी तालुक्यातील मुरमाडी तूप येथील राजेश नामदेव कोरे यांचे परिवारास शेळीपालन व्यवसायासाठी दहा हजाराचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजूर करण्यात आले. पशुसखी म्हणून दरमहा 2500 रुपये मानधनावर काम देण्यात आले. त्यांना दोन मुलं असून एकच मोबाईल होता. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बारावीत शिकणाऱ्या मुलास ऑनलाईन क्लाससाठी डिसेंबरमध्येच अँड्रॉईड मोबाईल घेऊन देण्यात आला. त्यामुळे दोघांच्याही ऑनलाईन शिक्षणाची सोय झाली. तर लहान मुलास कौशल्य विकास योजनेअंतर्गत तीन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
मुरमाडी तूप येथील सुखदेव पंढरी फुंडे यांच्या पत्नीस संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजूर करण्यात आले आहे. तर त्यांच्या सतरा वर्षाच्या मुलास पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे डोंगरगाव साक्षात येथील नारायण भोयर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या सुनेस महिला बचत गटाचे सदस्यत्व देऊन त्यांना अन्य शासकीय योजनेचे लाभ मंजूर करण्यात येत आहेत.
भाऊबीजला ओवाळणीसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी गेलेल्या जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळून संवेदनशीलता दाखवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here