15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ
लसीकरणास मुलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0
8

जालना, दि. 3 (प्रतिनिधी) – 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस आजपासून प्रारंभ झाला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना येथे सदर वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी लसीकरण मोहिमेस मुलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
जालना महिला रुग्णालयात आयोजित या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा महिला रुगणालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र पाटील आदींसह 15 ते 18 वयोगटातील मुलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
श्री. टोपे म्हणाले की, आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पहिल्याच दिवशी मुलांमध्ये लस टोचून घेण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. भारत सरकारच्या सूचनेनुसार मुलांच्या लसीकरणासाठी सर्व लसीकरण केंद्रांवर उचित व्यवस्था करण्यात आली आहे. 15 ते 18 वयोगटातील मुले ही फिरणारी असतात, त्यांना लस देण्याची अत्यंतिक गरज होती. कालच केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्यासोबत झालेल्या व्हीसीमध्ये या गटातील मुलांना लस देण्याचा जो निर्णय झाला, त्याबददल मी आभार व्यक्त केले. तसेच 12 ते 15 वयोगटातील मुलांनाही लस मिळण्यासाठी आग्रह केला. राज्याला अतिरिक्त लस पुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान आजपासून प्रारंभ झालेल्या मोहिमेत 15 ते 18 वयागटातील सर्व मुलांनी सहभाग घेऊन आपले लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन श्री. टोपे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here