लेख : रथसप्तमी ( १९ फेब्रुवारी ) – सनातन संस्था

0
27
Mahalaxmi mata

रथसप्तमी
माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी. हा सूर्यनारायणाची मनोभावे पूजा करण्याचा अन् त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. प्रतिवर्षी मकरसंक्रांतीला चालू होणाऱ्या हळदी-कुंकू समारंभांची रथसप्तमीला सांगता होते. या दिनाचे माहात्म्य अन् साजरा करण्याची पद्धत सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात जाणून घेऊया.

इतिहास : सोन्याच्या हिरेजडीत रथात सूर्यदेव बसलेला दिवस म्हणजेच ‘रथसप्तमी’ : सूर्यदेवाला साधना करतांना स्थिर उभे रहायला लागल्याने उभे राहून त्याला त्याची गति सांभाळता येईना. त्याचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्याची साधना नीट होईना. तेव्हा त्याने परमेश्वराजवळ त्याविषयी तक्रार केली अन् बसण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. ‘मी बसल्यानंतर माझी गति कोण सांभाळणार’, अशी त्याने परमेश्वराजवळ विचारणा केली. तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी सात अश्व (घोडे) असलेला सोन्याचा हिरेजडीत रथ तयार करून दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथात बसला, तो दिवस म्हणजे ‘रथसप्तमी’. याचा अर्थ ‘सात घोड्यांच्या रथ’.

१. ‘रथसप्तमी’ हा सूर्यदेवाचा जन्मदिन !

‘माघ शुक्ल पक्ष सप्तमीला ‘रथसप्तमी’ असे म्हणतात. महर्षि कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला, तो हा दिवस ! भगवान श्रीविष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे.

२. सूर्याचे उत्तरायणात मार्गक्रमण होत असल्याचे सूचक असलेला रथसप्तमीचा सण !

रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. ‘श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत’, अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो, तसेच वसंत ऋतू समीप आल्याचा सूचक असतो.

३. जीवनाचा मूळ स्रोत असलेला सूर्य !

सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे. सूर्यकिरणांतून शरिराला आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. काळाचे मोजमाप सूर्यावरच अवलंबून आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. तो स्थिर असून अन्य सर्व ग्रह त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतात. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात.

४. हिंदु धर्मातील सूर्योपासनेचे महत्त्व

सूर्योपासनेला हिंदु धर्मात पुष्कळ महत्त्व आहे. सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधःकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते. (उपासनेमुळे मूर्ती जागृत होते, तसे हे आहे.)

५. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या रवीचे (म्हणजे सूर्याचे) महत्त्व

ज्योतिषशास्त्रदृष्ट्या रवि (म्हणजे सूर्य) हा आत्माकारक आहे. ‘मानवी शरिरातील प्राण, आत्मिक बळ आणि चैतन्यशक्ती यांचा बोध रवीवरून होतो’, असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील रवि जितका बलवान, तितकी त्या व्यक्तीची जीवनशक्ती आणि रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. राजा, प्रमुख, सत्ता, अधिकार, कठोरता, तत्त्वनिष्ठता, कर्तृत्व, सन्मान, कीर्ती, आरोग्य, वैद्यकशास्त्र इत्यादींचा कारक रवि आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्‍व सप्ताहातील सात वार दर्शवतात. रथाला असणारी बारा चाके बारा राशी दर्शवतात.

६. रथसप्तमीला करावयाचा सूर्यदेवाचा पूजाविधी

रथसप्तमीला व्यक्तीने अरुणोदयकाली स्नान करावे. सूर्यादेवाची १२ नावे घेऊन न्यूनतम १२ सूर्यनमस्कार घालावेत. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. त्याला तांबडी फुले वाहावीत. सूर्याला प्रार्थना करून आदित्यहृदयस्तोत्रम्, सूर्याष्टकम् आणि सूर्यकवचम्, यांपैकी एखादे स्तोत्र भक्तीभावाने म्हणावे किंवा ऐकावे. रथसप्तमीच्या दिवशी कुठलेही व्यसन करू नये. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून प्रतिदिन सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालावेत. त्यामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते.’

रथसप्तमी साजरा करण्याची पद्धत

अ. सूर्यनारायणाची पूजा : रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.
आ. मकरसंक्रांत ते रथसप्तमी या काळातील कौटुंबिक विधी : ‘सुनेचे तीळवण, जावयाचे प्रथम वाण आणि बाळाचे बोरवण करतात. या वेळी सुनेला, जावयाला आणि बाळाला हलव्याचे दागिने करतात.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here