शासकीय रुग्णालयाच्या इमारतींचे फायर ऑडिट करून एका आठवड्यात संयुक्त आराखडा सादर करावा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

0
29
Collector Purthiraj B P

लातूर, दि.20(प्रतिनिधी):– जिल्ह्यातील महत्त्वाची व मोठी शासकीय रुग्णालय असलेल्या इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा एकदा अत्यंत सूक्ष्म व काटेकोरपणे फायर ऑडिट करून आग प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या साहित्य व उपकरणाचे संयुक्त अंदाजपत्रक एका आठवड्याच्या आत सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.

सर्व शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधासाठी बेसिक उपकरणे उपलब्ध करून देणार

महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांनी आग प्रतिबंधासाठी बेसिक सुविधा उपलब्ध केल्याची खात्री करून घ्यावी

सर्व नगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील खाजगी रुग्णालयांना आग प्रतिबंधात्मक सुविधा उपलब्ध करण्याबाबत नोटीस द्यावी

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी ऑडिट केले पाहिजे

आग प्रतिबंधाचा चे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक किमान महिन्यातून एकदा देण्याची व्यवस्था करावी


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालय इमारतीमध्ये आग प्रतिबंधात्मक सुविधा उपलब्ध करण्याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरदास, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिंदोळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, महापालिकेचे अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग व अग्निशमन विभागाने लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील इमारती, स्त्री रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय उदगीर या इमारतीचे केलेले फायर ऑडिट व त्या अनुषंगाने ढोबळमानाने सादर केलेले अंदाजपत्रक याबाबत समाधानी नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे पुन्हा अत्यंत सूक्ष्म व काटेकोरपणे आग प्रतिबंधासाठी संयुक्त आराखडा सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
या इमारतीचे फायर ऑडिट केल्यानंतर ज्याठिकाणी आगीचा जास्त जास्त धोका निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी प्राधान्य देऊन तात्काळ आग प्रतिबंधात्मक उपकरणे बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त अंदाजपत्रक सादर केल्यानंतर आग प्रतिबंधसाठी आवश्यक असलेली उपकरणे घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून शक्य तेवढा निधी उपलब्ध केला जाणार आहे व त्या व्यतिरिक्त अधिकचा निधी राज्य शासनाकडून मागणी करून ती कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने यासाठीचे आवश्यक असलेले अंदाजपत्रक त्वरित सादर करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सूचित केले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इलेक्ट्रिक पॅनेल असलेल्या रूमला आग प्रतिबंधात्मक उपकरणे बसविण्यात यावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी व ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये आग प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या बेसिक सुविधा व उपकरणे तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावीत, असे निर्देश पृथ्वीराज यांनी दिले. या ठिकाणी स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, फायर बकेट व फायरएक्स आदी सुविधा नॉम्सप्रमाणे उपलब्ध करून देण्याबाबत ही त्यांनी निर्देशित केले.
लातूर महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करून प्रत्येक खाजगी रुग्णालयात आग प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत का याची खात्री करून घ्यावी. ज्या रुग्णालयांनी अशा सुविधा केलेल्या नाहीत अथवा त्या अद्यावत केल्या नाहीत त्या रुग्णालयांना नोटीस देऊन त्या सुविधा उपलब्ध केल्याची खात्री करावी व ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सूचित केले. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील खाजगी रुग्णालयांना पत्र देऊन आग प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या बेसिक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व इमारतींचे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी ऑडिट करणे गरजेचे आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व अग्निशामक विभागाने आग प्रतिबंधक बाबतचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन किमान महिन्यातून एकदा करण्याबाबतची कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगून पोलीस विभाग, लातूर महापालिका व सर्व नगरपालिकांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालये, खाजगी कोचिंग क्लासेसची वेळोवेळी तपासणी करून त्या बाबतची माहिती दररोज गूगल सीटवर भरून ती विहित कालावधीत नियमितपणे पाठविण्याची कार्यवाही करावी असेही त्यांनी सूचित केले.
प्रारंभी बांधकाम विभाग व लातूर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी फायर ऑडिट च्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती बैठकीत सादर केली. काही इमारतीचे ढोबळमानाने अंदाजपत्रक तयार केले असून पुढील आठ दिवसात शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचे सुक्षम अंदाजपत्रक सादर करण्यात येईल असे त्यांनी बैठकीत सांगितले. जिल्हा प्रशासन अधिकारी शिवणे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी फायर ऑडिट च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून पुढील बैठकीपूर्वी अहवाल सादर करावा असे सूचित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here