गुणग्राहक राजा छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीने प्रभावी संघटन उभे राहिले –गणेश आष्टेकर

0
26
Ganesh Ashtekar


नवी दिल्ली, 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणग्राहकतेतून व दूरदृष्टीतून स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणा-या मावळयांचे संघटन निर्माण झाले त्याचाच परिणाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, असे प्रतिपाद शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक तथा वक्ते गणेश आष्टेकर यांनी आज केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने छत्रपती शिवाजी महराजांच्या 391 व्या जयंतीनिमित्ताने आज आयोजित केलेल्या ‘शिवरायांचे संघटन कौशल्य’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात श्री आष्टेकर यांनी हे विचार मांडले. तत्पूर्वी, परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले त्यांनी श्री आष्टेकर यांचे स्वागत केले व त्यांचा परिचय करून दिला.
यावेळी आपल्या संबोधनात श्री आष्टेकर म्हणाले, भारत देशामध्ये श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने संघटन कौशल्याचे उत्तम आदर्श बघायला मिळतात. या दोन्ही महान व्यक्तीमत्वांनी संघटन कौशल्याच्या जोरावर आपल्या सवंगळयांना एकत्र करून स्वराज्याची व अस्मितेची मोट बांधली. राजमाता जिजाऊ यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी संघटन कौशल्याचा प्रभावीपणे उपयोग केल्याचे दिसते. संघटन बांधणीसाठी आवश्यक असणारा विचार त्यांनी राजमाता जिजाऊंकडून घेतला, शस्त्रात्रे व अन्य संसाधनांची जुळवाजुळव केली, प्रभावी नेतृत्व दिले आणि उत्तम कार्यकर्ते निर्माण केले. याचाच परिपाक म्हणून त्यांनी उत्तम संघटन निर्माण केले.
आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांना त्यांनी ‘मावळा’ ही उपाधी देवून त्यांच्यामध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली. प्रभावी नेतृत्व व गुणग्राहकतेच्या जोरावर त्यांनी मावळयांना घोडेस्वारी, दांडपट्टा चालविणे, हेरगीरी, समुद्री किना-या लगतच्या मावळयांना समुद्रमार्गे होणा-या आक्रमाणाचा मुकाबला करणे आदींचे प्रशिक्षण दिले व त्यांना आपआपल्या क्षेत्रात तरबेज केले. मावळयांच्या कामाचे कौतुक केले प्रसंगी त्यांना बक्षीसीही दिली. छत्रतपी शिवरायांच्या कार्याने प्रेरित होवून त्यांना तत्कालीन समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाला. शिवबांच्या संघटनेत सामील झालेल्या मावळयांच्या आई-वडीलांकडून पाठिंबा मिळाला, कुटुंबांकडून, महिला, शेतकरी आदींकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी अधिक प्रभावीपणे मोहिमांची आखणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तम वैचारीक अधिष्टानाच्या बळावर प्रभावी संघटन निर्माण करून स्वराज्य प्राप्तीचे ध्येय पूर्ण केले व देश व जगासमोर मोठा आदर्श निर्माण केल्याचे श्री आष्टेकर म्हणाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटन कौशल्याविषयी विविध पुलैंची विस्तृत मांडणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here