कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवकथेला यंदा विराम! रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

0
27
Shree Sant Shiromani Manmth Swami


जालना : येथील अंबड रोडवरील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी संस्थानच्यावतीने दरवर्षी शिव कथेचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यंदा कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर कथेला यंदाच्यावर्षी विराम देण्याचा निर्णय झाला असून शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन अखंड शिव सप्ताह आणि श्री ग्रंथराज परमरहस्य पारायण व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सप्ताह संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. दिलीपअप्पा खाकरे यांनी दिली आहे. या संदर्भातील प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, येथील अंबड रोडवरील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी संस्थानच्या वतीने दरवर्षी शिव कथेसह अखंड शिवनाम सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. या कार्यक्रमाचे यंदाचे पंचविसावे वर्षे असून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाही शिव कथेचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी शिव कथा न घेण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला असला तरी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन मंगळवार दि. १६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या या सप्ताहामध्ये श्री. ग्रंथराज परमरहस्य पारायण आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवार दि. १६ फेब्रुवारी रोजी शिवकुमार संभाप्पा स्वामी मठपती (कौठा), शरणय्या स्वामी गुरुजी, गणेश स्वामी आणि प्रकाश मठपती स्वामी यांच्या हस्ते पुजा विधीचा कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवार ते सोमवारपर्यंत चालणार्‍या शिव कीर्तन सोहळ्यात अनुक्रमे शिभप सर्वश्री रमेशअप्पा लोणगावकर (लातूर), सुरमणी रमेश महाराज कस्तुरे,कु. साक्षीताई मुळे, अशोक महाराज पाथ्रुडकर, मन्मथअप्पा डांगे महाराज, क्षीरसागर महाराज, आशिषानंद महाराज धारुरकर यांचे कीर्तन होणार आहे. तर २२ फेब्रुवारी रोजी ग्रंथमिरवणूक तर २३ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहादरम्यान दररोज काकडा, शिवपाठ, रुद्राभिषेक, ग्रंथराज परमरहस्य पारायण, आरती, परमरहस्यावरील प्रवचन, शिवपाठ आणि रात्री शिवकीर्तन होणार आहे. प्रथम दिवसाच्या कार्यक्रमास माजी मंत्री श्री. अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती राहणार असून समाप्तीच्या दिवशी आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल यांची उपस्थिती राहणार आहे. या सर्व कार्यक्रमास समाज बांधव, भगिणींसह पंचक्रोशितील भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सप्ताह संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. दिलीपअप्पा खाकरे, उपाध्यक्ष बबनअप्पा लामदडे, दिगंबरअप्पा लाटकर, गणेशअप्पा एलगुंदे, प्रकाश मठपती यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here