शासनाने केली दर्पणकारांच्या अधिकृत चित्राची निवड

0
28
Balshashri jabhekar


जालना: मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र म्हणून महाराष्ट्र शासनाने सुप्रसिध्द चित्रकर्ती सौ. चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेल्या तैलचित्राची निवड केली आहे.
महाराष्ट्र शासनाने बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले असून आज शनिवारी, दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या २०९व्या जयंतीदिनी राज्य शासनाच्या मंत्रालय, विधिमंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा व तालुका येथील शासकीय कार्यालयांमधून जांभेकर यांना अभिवादन करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. त्याकरीता शासनातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सौ. चंद्रकला कदम यांनी तयार केलेल्या सदर तैलचित्राचा अंतर्भाव यापूर्वी महाराष्ट्र शासनाने राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नोव्हेंबर १९८५मध्ये SOCIAL REFORMERS OF MAHARASHTRA या नावाचे प्रसिध्द केलेल्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. ते पुस्तक माहिती आणि जनसंपर्क विभागांतर्गत नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येऊन ते कॉपी राईट करण्यात आले आहे. सदर पुस्तक तयार करण्याची जबाबदारी सुप्रसिध्द साहित्यिक दिवंगत श्री. य. दि. फडके यांच्यावर सोपविली होती. या पुस्तकासाठी महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांची चित्रे तयार करून देण्याचे काम सौ. चंद्रकला कुमार कदम यांच्यावर सोपविले गेले होते. त्यासाठी त्यांना आवश्यक ती संदर्भयुक्त माहिती पुरविण्यात आली होती. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर तसेच इतर समाजसुधारकांची तैलचित्रे दिवंगत श्री. फडके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली होती. त्या छायाचित्रांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचेही हे छायाचित्र आहे. ते छायाचित्र त्यावेळी माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे नियुक्त केलेल्या अंतर्गत समितीने अधिकृतम्हणून मान्य केलेले आहे. सदर तैलचित्र आता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आहे.
सौ. चंद्रकला कुमार कदम या एक चित्रकर्ती असून त्यांनी भारतीय संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आलेले स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे तैलचित्र तसेच महाराष्ट्र विधान भवनातील महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, दादासाहेब मावळंकर, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, एस.एम.जोशी, गुजरात विधानसभेतील स्वा.वि.दा.सावरकर, मुंबई उच्च न्यायालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, मौलाना अब्दुल कलाम आझाद, लोकमान्य टिळक, सी. डी. देशमुख, जगन्नाथ शंकर शेठ, शंकर दयाळ शर्मा यांची तैलचित्रे तयार केलेली आहेत. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील “विष्णूदास भावे नाट्यमंदिर”, तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नांदेड-वाघाळा महानगरपालिका, पिंप्री-चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका आदी संस्थांसाठी मान्यवरांची तैलचित्रेही सौ. कदम यांनीच तयार करून दिलेली आहेत. तसेच त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहासाठीही भव्य तैलचित्रे नुकतीच तयार करून दिलेली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here