विकासाची संकल्पना घेऊन गावांनी एकत्रिकरणाने काम करावे -जिल्हाधिकारी संदीप कदम

0
21
Sandip Kadam


भंडारा दि.16:– ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर आबांनी ग्रामस्वच्छता, तंटामुक्त सारख्या योजना राबवून गावांचा चेहरा-मोहरा आणि राज्याचे चित्रच बदलले. ही स्वच्छता चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी विकासाची संकल्पना घेऊन गावांनी एकत्रिकरणाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.
शासनाच्या विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनूसार स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींवर देण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराचे आज जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे हस्ते वितरण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझडे यावेळी उपस्थित होते.
भंडारा तालुक्यातील गणेशपूर, मोहाडी मधिल हरदोली, तुमसर- कर्कापूर, लाखनी- खराशी, साकोली- वडेगाव, लाखांदूर- जैतपुर व लाखनी तालुक्यातील बाम्हणी या ग्रामपंचायतींना सन 2019-20 चा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले. सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत तालुका सुंदर गाव व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना पारितोषिक प्राप्त रकमेतून नाविण्यपूर्ण कामे करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. यात प्रामुख्याने अपारंपारिक उर्जा संबंधित अभिनव प्रकल्प राबविणे, स्वच्छते बाबत प्रकल्प, महिला सक्षमीकरण व मुलांना अनुकूल प्रकल्प, स्वच्छ पाणी प्रकल्प, भौगोलिक माहिती प्रणाली बसविणे (जीआयएस), दर्जा वाढविण्यासाठीचे प्रकल्प, ग्रामपंचायत हद्दीत सौर पथदिवे बसविणे, ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी कुंपण घालणे, स्मार्ट ग्राम योजनेत निवड झालेल्या ग्रामपंचायतीने इंटरनेट वाय फाय सिस्टम बसविणे आदी कामांचा यात समावेश आहे. कार्यक्रमाचे संचलन सहाय्यक गटविकास अधिकारी टी. आर. बोरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here