स्वातंत्र्यदिनी 'इंडिया' नाव खटकते !

स्वतंत्र भारताचा यंदा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहाने साजरा होत आहे.

Jalna Nayak    14-Aug-2026
Total Views |
 
लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे.
स्वतंत्र भारताचा यंदा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहाने साजरा होत आहे. आपली देशभक्ती दर्शवण्यासाठी या राष्ट्रीय सणाच्या पूर्वसंध्येपासूनच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारे संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून फिरू लागले. आय लव्ह इंडिया'च्या तळपट्या असलेली छायाचित्रे 'स्टेटस'ला झळकू लागली. इंग्रज भारतातून जाऊन ७९ वर्षे उलटली तरी त्यांच्या भाषेचा आणि त्यांनी दिलेल्या नावाचा मोह आपल्याला स्वातंत्र्य दिनालाही आवरता आला नाही. ज्या देशाचा उच्चार इंग्रजीत केल्यावर पूर्णपणे बदलतो असा जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असावा. आज असे अनेक देश आहेत ज्यांनी परकीय गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम पारतंत्र्याच्या खुणा पुसल्या, गुलामगिरीची जाणीव करून देणारी प्रतीके नष्ट केली. आपण मात्र आज ७९ वर्षांनंतरही त्यांना कुरवाळत आहोत. परकीयांनी शहरांना, गावांना दिलेली नावे बदलण्यात यावी यासाठी देशात आंदोलने होतात, मोर्चे निघतात, संसदेत त्यावर वाद विवाद होतात; मात्र या देशाला परकीयांनी दिलेले 'इंडिया' नाव बदलावे यासाठी दुर्दैवाने कुठे आंदोलने होताना दिसत नाहीत. केंद्र सरकारने हे प्रयत्न करून पाहिलेही मात्र ते विरोधी पक्षांच्या आघाडीवर सूड उगवण्यासाठी होते कि व्यापक राष्ट्रीय भावनेतून होते याचा बोध सामान्य नागरिकांना नीटसा झाला नाही कारण 'इंडिया' शब्दाचा उल्लेख करुन केंद्र सरकारच्या अनेक योजना आजही कार्यरत आहेत. ज्या इंग्रजांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले त्या इंग्रजांनी भारताला दिलेले 'इंडिया' हे नाव आजही आपण मोठ्या अभिमानाने मिरवत आहोत. हे नाव बदलण्यासंदर्भातील निर्णय केंद्र सरकारने घ्यावा असे न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी योग्य टायमिंग साधण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. 'उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।' अर्थात 'असा एक देश जो समुद्राच्या उत्तरेला आणि बर्फाळ डोंगराच्या दक्षिणेला आहे त्याला 'भारतम' असे म्हटले जाते, असा उल्लेख हजारो वर्षांपूर्वीच्या विष्णू पुराणात आढळतो. जगातील सर्वात प्राचीन हिंदू संस्कृती ज्या प्रदेशाच्या अंगा खांद्यावर खेळली त्या पवित्र प्रदेशाला हिंदुस्थान असेही म्हटले जाते. भारत म्हणा किंवा हिंदुस्थान म्हणा या दोन्ही शब्दांची नाळ येथील मातीशी घट्ट रुजलेली आहे त्यामुळे याच नावाने या प्रदेशाची ओळख समस्त जगाला होणे अपेक्षित असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे 'इंडिया' हे नाव आज प्रचलित झाले आहे.
सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई