जालना/प्रतिनिधी : तीन वर्षांच्या चिमूकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अवघ्या ५७ दिवसांत दोषी ठरवून नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित काळापर्यंत जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचा रोटरी क्लब ऑफ जालनाच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.
कर्तव्यनिष्ठ तपास, प्रभावी पाठपुरावा आणि जलद न्यायप्रक्रियेसाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात उपविभागीय पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संदिप भारती यांच्यासह गुन्ह्याच्या विशेष तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, फौजदार सचिन सानप, पोलीस कर्मचारी भरत ढाकणे, धनंजय लोढे, जगन्नाथ जाधव, अजिम शेख, भगवान मुंजाळ, दुर्गेश गोफणे, रवि काळे, राहुल कटकम, धनाजी कावळे, रामप्रसाद रंगे आणि रवींद्र जायभाये यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ रोटरियन सुनीलभाई रायठठ्ठा म्हणाले की, जालना पोलीस दल मागील दोन वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी 'सुरक्षा मंत्र' उपक्रमाच्या माध्यमातून विशेष परिश्रम घेत आहे. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि बाल मानस चिकित्सक मानसी नोपानी यांनी या उपक्रमाची रूपरेषा आखलेली होती. त्याबद्दल जालनेकर नेहमीच कृतज्ञ राहतील. रोटरीचे अध्यक्ष प्रशांत महाजन म्हणाले की, रोटरी क्लब शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी बाल मानसशास्त्र व कायद्याचे संरक्षण याबाबत व्यापक जनजागृती मोहीम आणि कार्यशाळा घेत 'क्रिएट लास्टिंग इम्पक्ट' अंतर्गत कार्यरत आहे. पोलिसांच्या योगदानाबद्दल कर्तव्य भावनेतून आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ जालनाचे सचिव संदीप मुंदडा, क्लबचे पदाधिकारी अरुण अग्रवाल, रमेश मगरे, विनोद मोतीवाला, डॉ. दीपक बगडिया, हेमंत ठक्कर, शरद काबरा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विठ्ठल राजकर, उदय शिंदे उपस्थित होते.