बदनापूर : किशोर सिरसाठ
बदनापूर शहरातून जाणाऱ्या जालना-बदनापूर महामार्गावरील तहसील कार्यालय ते एकांत हॉटेलपर्यंत विद्युत रोषणाईसाठी उभारण्यात आलेल्या खांबांना तब्बल चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप वीज जोडणी मिळालेली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही यंत्रणा केवळ शोभेची ठरली असून, सध्या या विद्युत खांबांचा वापर बॅनर, होर्डिंग आणि राजकीय पक्षांचे झेंडे लावण्यासाठीच होत असल्याचे चित्र आहे.
सदर विद्युत रोषणाईच्या कामासाठी तब्बल पाच ते सात कोटी रुपयांचा खर्च झाल्याची चर्चा असून, एवढा मोठा निधी खर्च करूनही शहरातील नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. चार वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने उभारलेले विद्युत खांब आजही प्रकाशाची वाट पाहत उभे आहेत.

शहरातील प्रमुख मार्गावर रात्रीच्या वेळी नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत महामार्गावर विद्युत रोषणाई असणे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. मात्र, लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून खांब उभारण्यात आले असले तरी अद्याप त्यावर प्रत्यक्ष प्रकाश पडलेला नाही. त्यामुळे या कामाच्या नियोजनावर आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जनतेच्या पैशातून उभारलेले खांब बॅनरसाठी?
विशेष म्हणजे, विद्युत रोषणाईसाठी उभारण्यात आलेल्या खांबांचा सध्या राजकीय बॅनर, होर्डिंग आणि पक्षांच्या झेंड्यांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या पैशातून उभारलेले विद्युत खांब जनतेच्या सोयीसाठी की राजकीय जाहिरातींसाठी? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.या कामावर प्रत्यक्षात किती निधी खर्च झाला, किती रक्कम मंजूर झाली, किती रक्कम संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यात आली, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे का, तसेच चार वर्षांपासून विद्युत जोडणी का झाली नाही, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
निधी खर्च झाला, मग प्रकाश कधी पडणार?
सार्वजनिक निधीचा वापर हा नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासासाठी होणे अपेक्षित असताना, कोट्यवधी रुपये खर्च करूनही सुविधा सुरू होत नसेल तर जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. केवळ कामाचे बिल काढणे आणि प्रत्यक्षात सुविधा नागरिकांना न मिळणे, हा प्रकार असेल तर त्याची चौकशी कोण करणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
याप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची सद्यस्थिती, खर्चाचा तपशील आणि विद्युत रोषणाई सुरू करण्यास झालेल्या विलंबाचे कारण सार्वजनिक करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर बॅनर आणि होर्डिंग लावण्यात आले होते. यावर लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याच शहरात चार वर्षांपासून विद्युत रोषणाईचे खांब उभे असूनही नागरिकांना अद्याप प्रकाशाची सुविधा मिळालेली नाही.
त्यामुळे नेत्यांच्या स्वागतासाठी बॅनर-होर्डिंगवर लाखो रुपयांचा खर्च आणि जनतेच्या सुविधेसाठी उभारलेले खांब चार वर्षांपासून अंधारात, अशी विरोधाभासी परिस्थिती बदनापूर शहरात निर्माण झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी आणि प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता बदनापूरकरांचे लक्ष लागले आहे. कोट्यवधींच्या या कामाची चौकशी करून विद्युत रोषणाई तातडीने सुरू करावी आणि सार्वजनिक निधीच्या वापराचा संपूर्ण हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.