ग्रामसभा नाही, सुविधाही नाही! टेंभुर्णीत शुभम मुळेचे आमरण उपोषण

प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात स्वातंत्र्यदिनी बंड

Jalna Nayak    16-Aug-2026
Total Views |

प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात स्वातंत्र्यदिनी बंड
टेंभुर्णी,/ बी.डी.सवडे
जाफ्राबाद तालुक्यातील २५ हजार लोकवस्ती असलेल्या टेंभुर्णी शहरातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात स्वातंत्र्यदिनीच बंड पुकारण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षांचा लेखाजोखा न देणे, ग्रामसभा न घेणे आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते शुभम मुळे यांनी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण* सुरू केले आहे.
५ वर्षात गावात काय केले? हिशोब द्या"
शुभम मुळे यांची मुख्य मागणी आहे की, गेल्या ५ वर्षात ग्रामपंचायतीने निधीचा विनियोग कसा केला, कोणती कामे केली याचा लेखाजोखा जाहीर करावा. तसेच गावातील सर्व वार्डात रस्ते, पाणी, गटारी याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. ठिकठिकाणी *घाणीचे साम्राज्य* पसरले आहे. डास आणि घाणीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ
गावातील समस्या मांडण्यासाठी ग्रामसभा घेण्याची मागणी वेळोवेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभा घेण्यास कायम टाळाटाळ केली. लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला प्रशासन तयार नसल्याने अखेर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला, असे शुभम मुळे यांनी सांगितले.
"२५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात मूलभूत सुविधा नसतील तर स्वातंत्र्याचा अर्थ काय?" असा सवाल करत उपोषणस्थळी युवकांची मोठी गर्दी जमली होती. प्रशासनाने तात्काळ ग्रामसभा बोलावून गावाचा हिशोब सादर करावा आणि प्रलंबित कामे मार्गी लावावीत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
जोपर्यंत लेखाजोखा दिला जात नाही आणि ग्रामसभा घेतली जात नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा व गावबंद चा इशारा शुभम मुळे यांनी दिला आहे.