वडीगोद्री : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट अल्टीमेटम दिला आहे. मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी असल्याचे गृहीत धरून, हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
अंतरवाली सराटी येथे पार पडलेल्या बैठकीत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ५८ लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रे दिली जात असली, तरी प्रत्यक्षात प्रमाणपत्रांच्या वाटपात आणि ती रद्द करण्याच्या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट तसेच महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आपली चूक तातडीने सुधारून हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जात वैधता कायद्यातील २००१ आणि २०१२ मधील तरतुदींमध्ये बदल करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित व्याज परतावे तात्काळ अदा करण्याची मागणीही त्यांनी रेटून धरली. आगामी २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन होणार असून, यादरम्यान मराठा आरक्षणाचे सर्व प्रलंबित विषय मार्गी लावले जातील, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान समर्थकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.