अंबडमध्ये रंगणार ‘विधी व न्याय मराठी साहित्य संमेलन’;

साहित्यप्रेमींनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. संजय खोरे यांनी केले आहे

Jalna Nayak    18-Aug-2026
Total Views |

कंत्राटदार सार्वजनिक मालमत्तेला कुलूप लावून किंवा तिचा ताबा घेऊन सरकारला किंवा नागरिकांना वेठीस धरू शकत नाही,
 
अंबड, प्रतिनिधी
मराठी साहित्याच्या माध्यमातून संविधान, कायदा आणि न्यायव्यवस्थेची संकल्पना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुबोध भाषेत पोहोचवण्यासाठी अंबड येथे दोन दिवसीय ‘विधी व न्याय मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (मुंबई) आणि यशवंत प्रतिष्ठान (शेवगा, ता. अंबड) यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संजय खोरे यांनी दिली.
संविधानातील मूलभूत मूल्ये, नागरिकांचे हक्क, कर्तव्ये आणि सामाजिक न्याय याविषयी समाजात व्यापक जनजागृती घडवून आणणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. कायद्याची क्लिष्ट भाषा मराठी साहित्याच्या माध्यमातून सुलभ करून लोकांपर्यंत पोहोचवणे, तसेच साहित्यिक, कायदेतज्ज्ञ, न्यायक्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, लेखक, पत्रकार, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकाच वैचारिक व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडी आणि संविधान जागर दिंडीने होईल. या संमेलनात ‘कायदा आणि साहित्य’, ‘संविधान आणि सामाजिक न्याय’, ‘सामान्य नागरिक आणि न्यायव्यवस्था’ तसेच ‘मराठी भाषेतील कायदेविषयक साहित्य’ यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांचे वैचारिक परिसंवाद रंगणार आहेत. यासोबतच उद्घाटन सत्र, कायदेविषयक अभ्यासपूर्ण व्याख्याने, काव्यवाचन, साहित्यिक संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या संमेलनात पाहायला मिळणार आहे.
विधी, न्याय, संविधान आणि साहित्य यांचा हा मिलाफ महाराष्ट्राच्या सामाजिक व वैचारिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.साहित्यप्रेमींनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. संजय खोरे यांनी केले आहे.यावेळी स्वामी विवेकानंद वाचनालय अंबडचे अध्यक्ष शिवाजी धुपे, यशवंत व्याख्यानमाला संयोजन समितीचे अध्यक्ष राजेश भापकर यांची उपस्थिती होती