जालना : जेपीसी बँक आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम व भक्कम स्थितीत-सतीश पंच

खेळीमेळीच्या वातावरण वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; सभासदांना लाभांश वाटपाचा निर्णय

Jalna Nayak    23-Aug-2026
Total Views |
 
संचालक मंडळ ठेवी व कर्जात वृद्धी तसेच थकीत कर्जाच्या वसुलीवर विशेष भर देत आहे,
 
जालना : दि जालना पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या उत्कृष्ट व विश्वासार्ह कामकाजाच्या जोरावर १०९ वर्षे पूर्ण केली असून, बँक आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम व भक्कम स्थितीत आहे. बँकेची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी संचालक मंडळ ठेवी व कर्जात वृद्धी तसेच थकीत कर्जाच्या वसुलीवर विशेष भर देत आहे, असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन सतीश सिताराम पंच यांनी केले.
जालना पीपल्स बँकेची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील श्री गुरुगणेश सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी चेअरमन सतीश पंच हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.व्यासपीठावर बँकेचे व्हाईस चेअरमन किशोर देविदान, संचालक संजय भारतीया, सौ. सुनंदा नंदकिशोर अग्रवाल, सुनील चौधरी, ॲड. अनिल संचेती, राजकुमार दायमा, हितेंद्र शाह, अभय करवा, जयेश बाविशी, अनुराग अग्रवाल, सुनील बियाणी, सौ. वर्षा भक्कड, सुभाष वाघमारे, दीपक भुरेवाल, तज्ज्ञ संचालक सीए निखिल कैलासचंद बाहेती व बँकेचे महाव्यवस्थापक विजय जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना चेअरमन सतीश पंच पुढे म्हणाले की, दि. ३१ मार्चअखेर बँकेची एकूण आर्थिक स्थिती समाधानकारक राहिली असून बँकेने सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने सभासदांना लाभांश वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसीकडून नियमित विमा संरक्षण प्राप्त आहे. बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी मोबाईल बँकिंग सेवा कार्यान्वित केली असून, अनेक खातेदार याचा लाभ घेत आहेत. उर्वरित बचत खातेधारक व नजरगहाण कर्जदारांनीही मोबाईल बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. सोबतच थकीत कर्जदारांनी आपले कर्जखाते तातडीने बेबाक करून बँकेच्या विकासात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दि. ३१ मार्च २०२६ अखेर एकूण ठेवी ७३ कोटी ३४ लाख,एकूण कर्जवाटप ३६ कोटी ४९ लाख रुपये असून, निव्वळ नफा : रु. १६ लाख ४९ हजार एवढा झाला आहे. नेट एनपीए शून्य टक्के, ग्रॉस एनपीए ६.९१ टक्के, सीआरएआर २३.४० टक्के, नेटवर्थ ११ कोटी ४९ लाख रुपये असून, ऑडिट वर्ग ‘अ’ वर्ग आहे, असे ते म्हणाले.
सभेच्या सुरुवातीला श्री गणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कामकाजाची सुरुवात झाली. तसेच दिवंगत मान्यवर व सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत सभासद प्रा. शिवरतन मानधना, मोहन अबोले, राजेश अग्रवाल, विनोदी यादव यांनी भाग घेतला. विषय पत्रिकेवरील विषयांवर सविस्तर चर्चा होऊन त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन व्यवस्थापक विजय जोशी आणि मनोज जोशी यांनी केली. शेवटी उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन किशोर देविदान यांनी मानले.
सभेस विजयकुमार कामड, गेंदालाल झुंगे, सतीश बगडिया, विकास बागडी, नंदकिशोर तंबाखूवाला, देवेंद्र भुरेवाल, विजयकुमार बगडिया, बँकेचे कायदेशीर सल्लागार ॲड. महेश धन्नावत, ॲड. सतीश तवरावाला, ॲड. अलीझार यांच्यासह संचालक, सभासद, खातेदार, हितचिंतक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक मंडळाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सभासदांकडून धन्यवाद प्रस्ताव मंजूर
बँकेच्या अहवाल वर्षातील समाधानकारक कामकाजावर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, ज्येष्ठ सभासद मोहन अबोले यांनी संचालक मंडळाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल व बँकेला यशाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या धोरणात्मक प्रयत्नांबद्दल विशेष धन्यवाद प्रस्ताव सभागृहात मांडला. बँकेचे डिजिटायलेजेशन, अत्याधुनिक यूपीआय सुविधा देत बँकेने सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करत विविध वित्तीय निकषांवर केलेली उल्लेखनीय कामगिरी कौतुकास्पद असल्याचे यावेळी नमूद करून धन्यवाद प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास सभासद प्रा. शिवरतन मानधना यांनी जाहीर अनुमोदन दिले. उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात या प्रस्तावाला एकमुखाने मंजुरी देत बँकेच्या संचालक मंडळाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.