जालना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवात येथील जेईएस महाविद्यालयाच्या लोककला विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी समूह गायन, सुगम गायन आणि शास्त्रीय तालवाद्य वादनात प्रथम, तर चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
लाल बहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय (परतूर) आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय (मंठा) यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ सप्टेंबर रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातील समूह गायन स्पर्धेत जेईएसच्या विद्यार्थ्यांनी लोककला विभागाचे प्रा. कल्याण उगले लिखित ‘स्वातंत्र्य झाली भारतमाता’ हे देशभक्तीपर गीत व ‘अश्वारूढ देव’ हे गीत प्रभावीपणे सादर केले. सोहेब शेख, काजल आव्हाड, आनंद घुले, रोशनी पारवे आणि आदित्य मुदिराज यांच्या सादरीकरणाने सभागृहात देशभक्तीची भावना जागृत केली व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. सुगम गायन स्पर्धेत प्रा. उगले लिखित ‘मन मंदिरात माझ्या’ या भक्तीगीताचे केवळ एकतारी आणि दिमडीच्या साथीने सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाला उपस्थितांची दाद मिळाली आणि या प्रकारातही महाविद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. शास्त्रीय तालवाद्य वादन (पखवाज) प्रकारात अर्जुन धुमाळ या विद्यार्थ्याने आपल्या शास्त्रोक्त पखवाज वादनातून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच, चित्रकला स्पर्धेत वैष्णवी गोशिक हिने आपल्या चित्रातील कल्पकता आणि आशयघन कलात्मक मांडणीतून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या विद्यार्थ्यांना लोककला विभागप्रमुख प्रा. कल्याण उगले यांचे मार्गदर्शन लाभले. महोत्सवात संघाचे प्रमुख म्हणून डॉ. प्रा. मनोज महेर आणि डॉ. अमोल खांडेभराड यांनी जबाबदारी पार पाडली. जिल्हा पातळीवरील या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी बगडिया, सचिव श्रीनिवासजी भक्कड, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, मराठी विभागप्रमुख डॉ. यशवंत सोनुने सर्व प्राध्यापक वृंदांकडून विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.