घनसावंगी- मुक्या जीवांसाठी तहसीलदारांच्या क्वार्टरमध्ये पाणवठा

पाण्यासाठी भटकणाऱ्या वानराला मिळाला आधार; रमेश पागोटे यांचा संवेदनशील उपक्रम

Jalna Nayak    12-Sep-2026
Total Views |

तहसीलदार रमेश पागोटे यांनी आपल्या शासकीय क्वार्टरच्या परिसरातच पाण्याची व्यवस्था केली आहे.
 
 
घनसावंगी- घनसावंगी तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतशिवारातील पाणवठे, नाले, तलाव आटत चालले आहेत. विहिरींची पाणीपातळी खालावत असून माणसांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत मुक्या जीवांची अवस्था तर अधिकच बिकट झाली आहे. पाण्याच्या एका घोटासाठी वानर, पक्षी आणि इतर वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. या मुक्या जीवांची तहान ओळखून घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे यांनी आपल्या शासकीय क्वार्टरच्या परिसरातच पाण्याची व्यवस्था केली आहे.
पावसाचा खंड वाढत चालल्याने उन्हाची तीव्रता जाणवत आहे. शेतशिवारातील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडत असल्याने वन्यजीवांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. झाडांच्या सावलीत आसरा मिळाला, तरी तहान भागविण्यासाठी पाण्याचा थेंब मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी तहसीलदार पागोटे यांनी आपल्या निवासस्थानाच्या परिसरात छोटेखानी पाणवठा तयार करून त्यात नियमित पाणी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. या पाणवठ्यावर परिसरातील पक्ष्यांसह वानर आणि इतर मुक्या जीवांना पाण्याचा आधार मिळत आहे. नुकतेच तहानलेले वानर या पाणवठ्यावर आले आणि त्याने पाणी पिऊन आपली तहान भागविली. तहानलेल्या त्या जीवाने पाण्याचा घेतलेला प्रत्येक घोट जणू दुष्काळाची तीव्रता सांगत होता. माणसांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच मुक्या जीवांचाही विचार करण्याची गरज या दृश्यातून अधोरेखित झाली. दुष्काळाच्या झळा केवळ शेतकऱ्यांच्या घरापर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या आता जंगलातील आणि परिसरातील मुक्या जीवांपर्यंत पोहोचल्या आहेत. पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या या जीवांसाठी एखाद्या ठिकाणी ठेवलेले पाण्याचे भांडे किंवा तयार केलेला छोटासा पाणवठाही जीवनदायी ठरू शकतो. तहसीलदार पागोटे यांच्या उपक्रमातून हीच संवेदनशील जाणीव पुढे आली आहे. प्रशासकीय पदाची जबाबदारी सांभाळताना मुक्या जीवांची तहानही ओळखणे, ही माणुसकीची खरी ओळख आहे. दुष्काळाच्या काळात एका घोटासाठी भटकणाऱ्या वानराला तहसीलदारांच्या क्वार्टरमध्ये मिळालेला हा आधार प्रशासनातील संवेदनशीलतेचे दर्शन घडविणारा ठरला आहे.