जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे दुष्काळ निवारणासाठी आक्रमक पवित्रा

प्रति हेक्टरी १ लाखांच्या मदतीची मागणी

Jalna Nayak    01-Oct-2026
Total Views |
 
माजी मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालना जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन 
 
जालना : महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) व माजी मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालना जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असला, तरी संकटाची तीव्रता पाहता शासनाने तातडीने व्यापक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी आक्रमक भूमिका पक्षाने घेतली आहे.निवेदनातील प्रमुख मागण्यांनुसार, पेरणीनंतर उगवण न झालेल्या पिकांसाठी सोयाबीनला ५८ हजार व कापसाला ५२ हजार रुपयांनुसार तातडीने पीकविमा भरपाई देण्यात यावी. तसेच, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांचे थेट आर्थिक अनुदान बँक खात्यात जमा करावे. फळबाग, केळी, ऊस व धान उत्पादक शेतकऱ्यांनाही तातडीने विशेष मदत मिळावी.ग्रामीण भागाला मोठा दिलासा देण्यासाठी संपूर्ण जमीन महसूल व कृषी पंपांची वीजबिले माफ करावीत, संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि वंचित तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा. विद्यार्थ्यांची शैक्षणिक, वसतिगृह व मेस फी माफ करून, रोजगार हमी योजनेचे निकष शिथिल करत मागेल तिथे काम उपलब्ध करावे. पिण्याच्या पाण्याची व पशुधनाची टंचाई दूर करण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, वीज खंडित करू नये आणि लोडशेडिंग टाळावे. शेतकरी व शेतमजुरांच्या प्रत्येक कुटुंबाला २५ किलो मोफत धान्य द्यावे आणि फळबागांना टँकरने पाणीपुरवठा करावा. दसऱ्यापूर्वी व दिवाळीच्या आत सर्व आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करावी आणि या गंभीर प्रश्नावर विधिमंडळाचे ३ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.  यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. संजय काळबांडे, माजी आ. चंद्रकांत दानवे ,बबलु चौधरी,नंदुभाऊ देशमुख,एकबाल पाशा,सुरेश खंडागळे,सतिश टोपे,सोपान पाडमुख,कल्याण सपाटे,राम सिरसाट,पांडुरंग जऱ्हाड,उध्दव गोल्डे,राजेंद्र जाधव,गणेश बर्वे,अमोल जधाव,भरत कदम,भगवान नाईकनवरे,ज्ञानेश्वर धानुरे,अरुण पैठणे,राजेंद्र जाधव,बबनराव ढेरे,उमेश फसाटे,दिंगबर घोगरे,सुभाष जायभाये,गंगाधर कोरडे,नितीन मेघावाले,संदीपान पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.