उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे ध्येय ठरवा...

महामार्ग पोलीस उपनिरीक्षक आर.के.निकम यांचा सल्ला

Jalna Nayak    01-Oct-2026
Total Views |

 रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
जालना : एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. मुलांनी वेळेचे भान ठेवत मनात जिद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी ठेवत उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी ध्येय ठरविले तरच यशाचा मार्ग सापडतो, असा सल्ला महामार्ग पोलीस उपनिरीक्षक आर.के.निकम यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जामवाडी येथील रंगनाथराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग ' सेवा संकल्प अभियान अंतर्गत ' रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास महामार्ग पोलीस उपनिरीक्षक आर.के.निकम, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घोरपडे, वाहतूक शाखेचे किरण कणखर, आरएसपीचे जिल्हा समादेशक विजयकुमार बोटूळे, पर्यवेक्षक सुनील खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात बोलताना पोलीस उपनिरीक्षक निकम म्हणाले,की विद्यार्थ्यांनी स्वप्न केव्हाही मोठीच पाहावी. वेळेचे भान ठेवत आपण रस्ता सुरक्षिततेबाबत सतत जागृत राहिले पाहिजे,असे सांगितले. वाहन चालविताना कशी दक्षता घ्यावी,असे सांगून महामार्ग व समृद्धी महामार्गावर वाहन कसे चालवावे याचे नियम कोणते हेही उपनिरीक्षक निकम यांनी सांगितले. कार्यक्रमात जालना शहर वाहतूक शाखेचे किरण कणखर यांनी रस्ता सुरक्षिततेबाबत बोलताना सांगितले, की शालेय मुलांनी वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालवू नये. वाहतुकीचे नियम, चिन्हांचा अर्थ समजून घेत सिग्नलबाबत दक्षता ठेवली पाहिजे,असे सांगितले. विनापरवाना गाडी चालविणे, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न घालणे, ट्रीपल सीट गाडी चालविणे अशा घटनांबद्दल कोणते नियम आणि कायदे असतात याला कोणती शिक्षा होते,यावर किरण कणखर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बोलताना आरएसपीचे जिल्हा समादेशक विजयकुमार बोटूळे म्हणाले,की शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी
आरएसपी युनिटचे कार्य कसे चालते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना पर्यवेक्षक सुनील खेडेकर म्हणाले,की सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना कृतीशीलता कशी निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ.सुहास सदाव्रते यांनी केले. कार्यक्रमास ज्ञानदेव अवघड, मैनाजी खांडेभराड, प्रा.राजेंद्र आंधळे, राम मेहेत्रे, मधुकर नागरे, वामन घडलिंग यांची उपस्थिती होती.