जालना : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये मंडळनिहाय चारा छावण्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केली.
याबाबत मुंबई येथील रामटेक बंगल्यावर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई, चाऱ्याची कमतरता तसेच पशुपालकांसमोरील अडचणींबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या आठही तालुक्यांमध्ये यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले, तलाव व जलसाठे पुरेशा प्रमाणात भरलेले नसल्याने जनावरांसाठी पिण्याचे पाणी तसेच चारा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात मंडळनिहाय किमान एक चारा छावणी सुरू करून तेथे पुरेशा प्रमाणात चारा, पिण्याचे पाणी आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच परिस्थिती अधिक गंभीर असलेल्या भागात गरजेनुसार अतिरिक्त चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
दुष्काळग्रस्त शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा भाऊसाहेब घुगे यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण फुके पाटील, मा. जि. प. सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषराव बोडखे पाटील आणि प्रगतिशील शेतकरी रामेश्वर दराडे उपस्थित होते.