जालना नायक विशेष
विनोद काळे
जालना : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या गावांतील शाळांचा कायापालट करून त्यांना ‘आदर्श शाळा’ बनविण्याची शासनाची घोषणा झाली; मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटूनही जालना जिल्ह्यात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, हा प्रश्न कायम आहे. ९५ कोटी रुपयांची तरतूद, अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा आणि आदर्श शाळांचा गाजावाजा झाला; प्रत्यक्षात मात्र स्वातंत्र्यसैनिकांच्या गावांतील शाळांना अपेक्षित सुविधा मिळाल्या का, हे अद्याप समोर आले नाही.
मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या दगडाबाई देवराव शेळके यांच्या धोपटेश्वर (ता. बदनापूर) या गावातील जिल्हा परिषद शाळेची स्थिती या योजनेच्या अंमलबजावणीचे उदाहरण ठरत आहे. दगडाबाई शेळके यांना ‘मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या स्मारकासाठी शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असतानाही हा निधी अद्याप प्राप्त झालेला नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे क्रांतीवीरांच्या स्मृतींचा गौरव केवळ घोषणांपुरताच राहणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
१६ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील ७६ तालुक्यांमधील स्वातंत्र्यसैनिकांच्या गावांतील शाळांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत विशेष बाब म्हणून निवड करून त्यांचा विकास करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी ९५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. निवडलेल्या शाळांमध्ये आधुनिक वर्गखोल्या, आयडियल सेंटर, अटल टिंकरिंग लॅब, सीसीटीव्ही, क्रीडांगण आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते.
मात्र धोपटेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत या योजनेतून नेमकी किती कामे झाली, किती निधी खर्च झाला आणि शाळेला ‘आदर्श शाळे’च्या निकषांनुसार कोणत्या सुविधा मिळाल्या, याचा स्पष्ट तपशील अद्याप समोर आलेला नाही. शिक्षण विभागाचे अभियंता मनोज ढवळे यांच्या माहितीनुसार या ठिकाणी तीन प्री-फॅब लॅब उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ तीन प्री-फॅब लॅब उभारून ९५ कोटींच्या योजनेतील उद्दिष्टपूर्ती दाखवली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
घोषणा मोठ्या; निधी मात्र प्रतीक्षेत
एका बाजूला मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रम आणि घोषणा केल्या जात आहेत; तर दुसरीकडे त्यांच्या गावांतील शाळा आणि स्मारकांच्या विकासासाठी जाहीर केलेल्या निधीची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शासनाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील तफावत आता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. आदर्श शाळा योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील किती शाळांची निवड झाली, प्रत्येक शाळेसाठी किती निधी मंजूर झाला, किती निधी वितरित झाला, प्रत्यक्षात किती कामे झाली आणि किती कामे अद्याप प्रलंबित आहेत, याचा सविस्तर हिशेब शिक्षण विभागाने सार्वजनिक करणे आवश्यक आहे.
दगडाबाईंच्या स्मारकाचे ५ कोटी कुठे अडकले?
दगडाबाई शेळके यांच्या स्मारकासाठी जाहीर करण्यात आलेले ५ कोटी रुपये नेमके कोणत्या टप्प्यावर अडकले आहेत? निधी मंजूर झाला असेल तर त्याचे वितरण का झाले नाही? धोपटेश्वर येथील शाळेच्या विकासासाठी निधीची तरतूद झाली असल्यास त्यातून कोणती कामे प्रस्तावित आहेत आणि प्रत्यक्षात किती कामे पूर्ण झाली? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित विभागांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. मात्र, अद्याप अपेक्षित माहिती प्रशासनाकडे प्राप्त झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
चौकशी करणार
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत विशेष बाब म्हणून निधी उपलब्धतेबाबत चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.
आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी, जालना