जालनाकरांनी वाहिली ज्येष्ठ समाजसेवक नाना पाटेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली

जुना जालन्यातील ऐतिहासिक गांधी चमन येथे एका शोकसभेचे आयोजन

Jalna Nayak    10-Oct-2026
Total Views |
 
नाना पाटेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली
 
जालना,(विशेष प्रतिनिधी): "समाजासाठी जगणे आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवणे, हाच खरा मानवी धर्म आहे." याच विचारांचे रूप असलेले ज्येष्ठ समाजसेवक नाना पाटेकर यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, अशा शब्दांत जालनाकरांनी आपल्या लाडक्या समाजसेवकाला आज सांध्यसमयी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशन, जालना यांच्या वतीने आज (शनिवारी) सायंकाळी साडेचार वाजता जुना जालन्यातील ऐतिहासिक गांधी चमन येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. कलाम यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. "एक विचार मनापासून केलेल्या प्रत्येक कार्यात समाजाचा आणि तरुण शक्तीचा विकास आहे, आणि समाजासाठी जगणे हेच खरे समाधान आहे," ही ओळ फाउंडेशनच्या बॅनरवर झळकत असताना उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात नाना पाटेकरांच्या समाजकार्याची आठवण तरळली.‘नाना पाटेकर हे केवळ नाव नसून एक विचार’कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना योगेश चीरखे यांनी फाउंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या समाजोपयोगी कार्याची माहिती दिली आणि नाना पाटेकरांच्या निस्वार्थ सेवेचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला
 
उपमहापौर राजेश राऊत यांनी  नानांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "समाजासाठी निस्वार्थपणे झटणारी व्यक्ती कधीही मरत नाही, ती विचारांच्या रूपाने सदैव जिवंत राहते. नानांच्या या अफाट कार्यातून आजच्या तरुण पिढीने प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे.
 
"फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कोम्रेड सागिर अहमद रजवी म्हणाले, "नाना पाटेकर हे केवळ एक व्यक्ती नसून एक विचार आहेत. डॉ. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा खरा वसा त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिला. आमची फाऊंडेशन आज त्यांच्याच विचारांवर चालून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे."
 
याप्रसंगी इकबाल पाशा यांनीही मनोगत व्यक्त करत, आजच्या काळात नानांसारख्या संवेदनशील समाजसेवकांची गरज अधोरेखित केली. या श्रद्धांजली सभेत जालन्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, शे. महमूद, रविकांत जगधने, राजेंद्र जाधव, अशोक साबळे, योगेश चिरखे, राधेश्याम जैस्वाल, दशरथ इंगळे, म्हरून फुलारी, गफार बिग, गोविंद मदनुरे, मनोज मदनुरे, अशोक शाळके, कविता जाधव, मधुकर देशपांडे, राम कुराळ, शाकीर शेख, जमाल शेख, कृष्णा जाधव, किशोर धुगे, दादासाहेब जलाल पठाण, रोहिणी नकवडे, संजय जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.