जालना- जालना शहरातील समर्थ नगर परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चार घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, चोरीचा मोटारसायकलसह २ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किशोरसिंग ऊर्फ टकल्या
रामसिंग टाक (वय ३०, रा. द्वारकानगर, जालना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील त्याचे दोन साथीदार आणि चोरीचे दागिने विकत घेणारा सोनार अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक तेजबीरसिंग संधू यांनी जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. ३० सप्टेंबर रोजी समर्थ नगर, जुना जालना येथे घरफोडी झाली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी किशोरसिंग टाक याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने कसबा, जुना जालना, जयशंकर नगर आणि गोपीकिशन नगर परिसरातील घरफोड्यांच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच, सुमारे १५ दिवसांपूर्वी गुंडेवाडी परिसरातून मोटारसायकल (क्रमांक एमएच २१ सीजे ३६०२) चोरी केल्याचेही तपासात समोर आले. या चोरीच्या मोटारसायकलचा वापर करून आरोपीने साथीदारांसह गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घरफोड्यांमध्ये चोरलेले दागिने एका सोनाराला विकल्याचे आरोपीने सांगितले आहे. या प्रकरणात फरार असलेल्या दोन साथीदारांसह सोनाराचा शोध पोलीस घेत आहेत.
चार गुन्ह्यांची नोंद
या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात दोन, तर सदर बाजार पोलीस ठाण्यात दोन असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक तेजबीरसिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.