जालना, घनसांवगीः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मराठवाड्यात उच्चांकी दर देणारा समृद्धी कारखाना युनिट नंबर २ सह आगामी गाळप हंगामासाठी सज्ज झाला असून १५ ऑक्टोबर २०२६ पासून समृद्धी युनिट १ आणि २ चे गाळप सुरू होणार आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन कारखान्याने ७५० ते ८०० टोळ्यांची यंत्रणा उभी केली असून १०० ते १२० दिवसांत कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच कारखाना प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठरणाऱ्या दराव्यतिरिक्त प्रति टनामागे ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी केली आहे.
यंदा राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत समृद्धी कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी हित समोर ठेवून पाण्याअभावी वाळत असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने तोडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ७५० ते ८०० ऊसतोड टोळ्यांची यंत्रणा सज्ज केली आहे. समृद्धी साखर कारखान्याने युनिट नंबर २ सुरू करून आपली गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळे यंदा युनिट १ व २ मिळून १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सर्व शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होणार असल्याने शेतकऱ्यांनी ऊसतोडीची घाई करू नये, समृद्धी कारखाना प्रत्येक गावात ऊसतोड यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना प्रति टनामागे ३०० रुपयांपर्यंत अनुदान
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय समृद्धी कारखान्याने घेतला आहे. शेतकऱ्यांनी प्रोग्रॅम येऊनही आपला ऊस मुदतीनंतर गाळप केल्यास अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १५ जानेवारीदरम्यान ऊस गाळप झालेल्या शेतकऱ्यांना ५० रुपये प्रति मे. टन, १५ ते ३० जानेवारीदरम्यान १०० रुपये आणि १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान गाळप झालेल्या उसाला २०० रुपये आणि १५ ते २८ फेब्रुवारीदरम्यानच्या उसासाठी ३०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांनी या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याने केले आहे.
दिवाळीत १०० रुपयांचा वाढीव हप्ता
दुष्काळी संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी १०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे वाढीव हप्ता देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे. विशेष म्हणजे हा अंतिम हप्ता नसून दिवाळीनंतर अंतिम हप्ता जाहीर करण्यात येणार असल्याचे सतीश घाटगे यांनी स्पष्ट केले आहे. गाळप हंगाम २०२५-२६ च्या उसाला पहिला हप्ता २८००, दुसरा हप्ता १०० असे आतापर्यंत २९०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे रक्कम देण्यात आली आहे. त्यात १०० रुपयांचा तिसरा वाढीव हप्ता दिवाळीत देण्यात येणार असून त्यानंतर अंतिम दराची घोषणा होणार आहे.
दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असल्याने समृद्धीचे युनिट नंबर १ व २ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचा ऊस पाण्याअभावी जळून जात आहे त्यांनी विनाविलंब तोड दिली जाईल. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यांना ऊस न देता आपल्या भागातील कारखान्यांनाच द्यावा, असे आवाहन माझे शेतकऱ्यांना राहील. तसेच शेतकऱ्यांनी हार्वेस्टरऐवजी मजुरांच्या टोळीकडून ऊसतोड करावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या जनावरांना सहज चारा उपलब्ध होईल.
- सतीश घाटगे पाटील, (चेअरमन, समृद्धी साखर कारखाना)