आधुनिक तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि समाजोपयोगी संकल्पनांवर विद्यार्थ्यांनी सादर केले प्रयोग

जालना : मत्स्योदरी तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा उत्साहात

Jalna Nayak    10-Oct-2026
Total Views |

मत्स्योदरी तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय  प्रकल्प स्पर्धा उत्साहात
 
जालना : शहरातील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तंत्रनिकेतन विभागाच्या वतीने कर्मयोगी अंकुशरावजी टोपे यांच्या जयंतीनिमित्त दि. ७ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नाविन्यपूर्ण व तांत्रिक प्रकल्पांचे सादरीकरण केले.
स्पर्धेचे उद्घाटन मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड आणि सहायक प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल भालेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आले. यावेळी कर्मयोगी अंकुशरावजी टोपे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सहकार व संस्थात्मक कार्याचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा आदर्श घेऊन समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण संशोधनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
या प्रकल्प स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील समस्या, आधुनिक तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि समाजोपयोगी संकल्पनांवर आधारित विविध प्रकल्प सादर केले. परीक्षकांनी प्रकल्पांची नाविन्यता, तांत्रिक गुणवत्ता, उपयुक्तता, कार्यक्षमता आणि सादरीकरण या निकषांच्या आधारे परीक्षण केले. परीक्षक म्हणून शासकीय तंत्रनिकेतन व पीईएस तंत्रनिकेतन येथील प्रा. पांडुरंग आवटे, प्रा. हिवराळे आणि प्रा. ठाकूर यांनी काम पाहिले.

मत्स्योदरी तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय  प्रकल्प स्पर्धा उत्साहात  
 
स्पर्धेत मत्स्योदरी तंत्रनिकेतन, जालना येथील सागर शिंदे, कु. अनुष्का तुपे, तुषार निकम आणि आनंद जाधव यांच्या ‘एक्सोस्केलेटन पॉवर आर्म’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांक व रोख ७,००० रुपये पारितोषिक मिळाले. शासकीय तंत्रनिकेतन, अंबड येथील कु. गायत्री उगले, कु. अस्मिता लोणकर, कु. नंदिनी तावर आणि कु. गायत्री भुंबर यांच्या ‘स्मार्ट एक्झाम सीट नंबर ट्रॅकिंग सिस्टीम’ या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक व रोख ५,००० रुपये पारितोषिक मिळाले. तर आयसीईईएम पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर येथील कु. पूनम भारवाल, प्रतीक गाडेकर, कार्तिक वडाळकर आणि संकेत काळे यांच्या ‘ग्रीड गार्ड एआय इंटेलिजंट इलेक्ट्रिकल फॉल्ट’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांक व रोख ३,००० रुपये पारितोषिक मिळाले. विजेत्या सर्व संघांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मत्स्योदरी तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय  प्रकल्प स्पर्धा उत्साहात  
 
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. बिरादार, तंत्रनिकेतनचे प्रभारी प्रा. अविनाश दवणे, विभागप्रमुख प्रा. गोविंद बागल, प्रा. रोहित कडोस, प्रा. पवन भाग्यवंत, प्रा. बाळू मिसाळ, प्रा. लहू भोसले, प्रा. सूरज लोहकरे आणि प्रा. परमेश्वर पवार यांची उपस्थिती होती.