धावड्यात एकाच रात्री पाच दुकाने फोडली

कुलूप तोडण्यासाठी वापरलेली लोखंडी टॉमी घटनास्थळी टाकून चोरटे पसार; पोलिसांकडून रात्रीची गस्त

Jalna Nayak    11-Oct-2026
Total Views |

व्यापाऱ्यांसोबत पोलिसांची बैठक 
 
धावडा - भोकरदन तालुक्यातील धावडा येथे शनिवार, १० ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी पाच दुकाने फोडून रोकड लंपास केली. बसस्थानकावरील हॉटेल आणि कृषी सेवा केंद्रासह गावातील मेन रोडवरील फोटो स्टुडिओ, भवानी चौकातील शीतपेय विक्रीचे दुकान आणि जामा मशिदीजवळील किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील पैसे चोरले. या घटनांमध्ये आठ हजार ५१० रुपयांची रोकड चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी सकाळी व्यापारी दुकाने उघडण्यासाठी आले असता चोरीचे प्रकार उघडकीस आले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी पारध पोलीस ठाण्याला दूरध्वनीद्वारे माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने आणि पोलीस कर्मचारी सुनील जाधव व शिवाजी भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता ते बंद असल्याचे आढळले. चोरट्यांनी सोनल कृषी सेवा केंद्रातून दोन ते तीन हजार रुपये, मेवाड हॉटेलमधून १० रुपयांचे नाणे, गजानन किराणा दुकानातून ५०० रुपये आणि शीतपेय विक्रीच्या दुकानातून सोयाबीन विक्रीच्या रकमेतून सहा हजार रुपये चोरल्याची माहिती देण्यात आली. चोरीसाठी वापरलेली लोखंडी टॉमी आणि काही आगपेट्या चोरट्यांनी अजिंठा-बुलढाणा राज्य महामार्गावरील एका भुसार व्यापाऱ्याच्या दुकानासमोर टाकून दिल्या. पोलिसांनी ही टॉमी ताब्यात घेतली आहे.
व्यापाऱ्यांसोबत पोलिसांची बैठक
घटनेनंतर पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांनी व्यापारी आणि ग्रामस्थांची बैठक घेतली. रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोबाईल पथकांमार्फत गस्त घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच गावात रात्री शिट्टी वाजवत गस्त घालण्यासाठी राखणदार नेमून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावात एकाच रात्री पाच दुकाने फोडण्यात आल्याने व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.