बी. डी. सवडे
टेंभुर्णी : अकोलादेव येथे जीवरेखा नदीवर सहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून सिमेंट बंधारे बांधण्यात आले; मात्र
नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण न केल्याने ऐन पावसाळ्यात हे बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे शासनाचा
निधी आणि जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट दोन्ही पाण्यात गेल्याचे विदारक चित्र निर्माण झाले असून, परिसरात प्रचंड
खळबळ उडाली आहे.
शासनाने दुष्काळ निवारणासाठी २०१२ मध्ये जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली होती. या
अभियानांतर्गत नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण करणे अपेक्षित होते. त्यानुसार अकोलादेव
ग्रामपंचायतीने जीवरेखा नदीचे खोलीकरण-रुंदीकरण करून बंधारे बांधण्याची मागणी माजी खासदार व भाजप नेते
रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोष पाटील दानवे यांच्याकडे लावून धरली होती. लोकप्रतिनिधींच्या विशेष
प्रयत्नातून प्रत्येकी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन अकोलादेव येथे ३, गणेशपूर येथे २, टेंभुर्णी येथे २ आणि सावंगी
येथे २ असे सिमेंट बंधारे उभारण्यात आले. परंतु, नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यातच आले नाही. परिणामी,
पावसाळ्यात आलेले पाणी वाहून गेले आणि बंधारे कोरडेठाक राहिले. विशेष म्हणजे, १६ ऑक्टोबर २०१७ रोजी
जलयुक्त शिवार कामांची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत ही कामे अधिक
प्रभावीपणे राबवण्याच्या कडक सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. तालुक्यातील इतर गावांना या अभियानाचा फायदा
झाला असला, तरी अकोलादेव गाव मात्र याला अपवाद ठरले आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुबलक
पाऊस होऊनही पावसाळ्यातच अकोलादेव परिसरात आज भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान,
'शासकीय आदेशांची पायमल्ली करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी आणि जीवरेखा नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे
काम तात्काळ हाती घ्यावे,' अशी तीव्र मागणी शेतकरी व गटशेती प्रमुख लक्ष्मणराव सवडे, भावराव आटपळे, मदनराव
सवडे, भास्कर सवडे, बाबुराव सवडे, संदीप सवडे, रामराव मोढेकर, सूर्यकला सवडे, कमलताई सवडे यांच्यासह
परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
‘जीवरेखा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाले असते तर आज दुष्काळाचा सामना करावा लागला नसता. या प्रकरणी
जालना जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी व कामाला तात्काळ मंजुरी द्यावी.’
— दादाराव सवडे, पंचायत समिती सदस्य