नवरात्र सुरू झालं की वातावरणात एक वेगळंच चैतन्य पसरते. विविध मंदिरांमध्ये देवीच्या आरत्या घुमू लागतात, घराघरांत घटस्थापनेची तयारी सुरु होते, गरबा-दांडियाच्या तालावर पावलं थिरकू लागतात आणि बाजारपेठा नऊ रंगांच्या साड्यांनी सजतात. हल्ली भक्ती, उत्साह, परंपरा आणि रंगांची उधळण यामुळे नवरात्र सणाला एक वेगळंच रूप प्राप्त होताना दिसतंय. प्रत्येक दिवसाचा ठरलेला रंग, त्याला साजेशा बांगड्या-दागिन्यांची खरेदी आणि समाजमाध्यमांवरील छायाचित्रांचा झगमगाट...! हे सगळं पाहताना मनात प्रश्न पडतो की, ‘नवरात्र हा भक्तीचा उत्सव आहे की, रंगांच्या प्रदर्शनाचा सोहळा..? नवरात्र हा शक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा उत्सव आहे. मात्र काही ठिकाणी भक्तीच्या मंदिराबाहेर दिखाव्याचा मंडप उभा राहताना दिसतो.
नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे नऊ रंगांच्या साड्यांची जणू रंगपंचमीच..! त्याला साजेशी बांगडी, टिकली, दागिने, त्यावर शोभणारा मेकअप, याची आधीपासूनच तयारी सुरू असते. कार्यालयात, सोसायटीत आणि नातेवाइकांमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा, मैत्रिणींच्या गटात रंगांची रंगणारी चर्चा.. कारण रंग जुळले की फोटो छान येतात, मग सोशल मीडियावर पोस्ट टाकता येते आणि पोस्टला भरपूर लाईक्स मिळाले की आनंदाला आणखी चार चाँद लागतात..!
रंगांना विरोध असण्याचे कारण नाही. उलट, रंग हे जीवनाचे सौंदर्य आहेत. मात्र, साडीच्या पदरात रंगांची उधळण करताना मनाच्या पदरात माणुसकीची जपणूक होते का?हा खरा प्रश्न आहे. कारण बाह्यरंगांनी व्यक्तिमत्त्व सजते; पण अंतर्मनातील सद्गुणांनीच माणूस खऱ्या अर्थाने उजळत असतो. या सगळ्यात गैर काहीच नाही. नटणं, सजणं, आवडते कपडे घालणं, आनंद साजरा करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे.
रंगांमुळे आयुष्याचंसौंदर्य खुलत असेलही. पण इथे प्रश्न रंगांचा नाही; प्रश्न आहे तो रंगांच्या नादात आपण सणाचा मूळ अर्थ विसरत चाललोययाचा.! भक्तीपेक्षा साडीचा रंग महत्त्वाचा आणि मनाच्या प्रसन्नतेपेक्षा फोटोला मिळणाऱ्या लाईक्सची संख्या महत्त्वाची वाटत असेलतर भक्तीचं रूपांतर नकळत दिखाव्यात होत नाही ना..? हो असेल तर ही नक्कीच आत्मपरीक्षणाची वेळ आहे.
कधी कधी असं वाटतं की, नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांइतकीच चर्चा नऊ रंगांची असते. कोणता रंग ट्रेंडमध्ये आहे, कोणत्या रंगाची साडी अधिक उठून दिसते आणि कोणाचा फोटो सर्वाधिक सुंदर दिसतोयाची जणू अनौपचारिक स्पर्धाच सुरू झालीय. देवीच्या दर्शनासाठी गेलेली नजर कधी कॅमेऱ्याच्या पडद्यावर अडकून राहते तर कधी आरतीच्या ज्योतीपेक्षा मोबाईलचा फ्लॅश अधिक तेजस्वी वाटू लागतो.म्हणून क्षणभर थांबून स्वतःला विचारायला हवं ‘आपण उत्सव साजरा करतोय की उत्सवाच्या नावाखाली प्रदर्शन मांडतोय..?
पिवळ्या रंगाच्या साडीचा सूर्य चेहरा उजळवतो; पण मनातील मत्सराचे ढग दूर करण्यासाठी अंतर्मनातही असा प्रकाश हवाय. दुसरीच्या साडीचे कौतुक ऐकले की आपल्या कपाटातील साड्या अचानक जुन्या वाटू लागतात. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याऐवजी स्वतःच्या तुलना करण्यातच आनंदाचा सूर्य मावळून जातो.
हिरवा रंग समृद्धीचा, निसर्गाचा आणि नव्या पालवीचा आहे. झाडाच्या फांदीवर उमलणारे कोवळे पान जसा आशेचा संदेश देतेतसे हिरव्या रंगाने जीवनात सकारात्मकता फुलायला हवी. परंतु मनाच्या बागेत प्रेमाची फुले फुलण्याऐवजी मत्सराचे काटे वाढत असतील, तर हिरवी साडी नेसून काय उपयोग..? निसर्ग कधी दुसऱ्या झाडाच्या फुलांचा हेवा करत नाही. प्रत्येकाला आपापल्या परीने बहरण्याची संधी देतो.. माणसानेही दुसऱ्याच्या यशात अडथळे आणण्याऐवजी त्याच्या प्रगतीला हातभार लावायला यातून शिकलं पाहिजे.
लाल रंग शक्ती, धैर्य, उत्साह आणि क्रांतीचे प्रतिक आहे. देवीच्या तेजस्वी रूपाची आठवण देणारा हा रंग अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतो. मात्रही शक्ती जर अहंकाराच्या आगीत जळू लागलीतर नात्यांची राख व्हायला वेळ लागत नाही. आवाज चढवणे म्हणजे सामर्थ्य नव्हे; दुसऱ्याला कमी लेखणे म्हणजे मोठेपणा नव्हे; तर खरे सामर्थ्य असते ते दुर्बलाच्या पाठीशी उभे राहण्यात, अन्यायाला विरोध करण्यात...
केशरी रंग मनात उत्साहाची ज्योत पेटवतो तसेच हा रंग ऊर्जा, त्याग आणि ध्येयनिष्ठेची देतो. पण समाजसेवेच्या नावाखाली प्रसिद्धीचे फटाके फोडले जात असतील, तर त्या ऊर्जेचा उपयोग काय..? मदतीचा हात देताना छायाचित्रकाराचा शोध घेण्यापेक्षा गरजू माणसाच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे अधिक महत्त्वाचे.. कारण खऱ्या सेवेला जाहिरातीची गरज नसते; तिचा सुगंध आपोआप दरवळत असतो.
पांढरा हा शांततेचा, पवित्रतेचा आणि निर्मळतेचा रंग आहे. शुभ्र वस्त्रांप्रमाणे मनही स्वच्छ असावे. परंतु ओठांवर गोड शब्द आणि मनात कपट, चेहऱ्यावर सदाचाराचा मुखवटा आणि वागण्यात स्वार्थ असेलतर नेसलेला पांढरेपणा किती काळ टिकणार.? आरशावरची धूळ पुसून चेहरा स्वच्छ पाहता येईल; पण मनावर साचलेली धूळ पुसण्यासाठी आत्मपरीक्षणाचीच गरज असते.
आकाशाच्या विशालतेचा आणि समुद्राच्या अथांगतेचा परिचय निळा रंग करून देतो. या विशालतेत मन मात्र जात, धर्म, भाषा, श्रीमंती-गरीबी अशा भिंतींमध्ये अडकते..निळी साडी नेसताना विचारांनाही निळ्या आकाशाची विशालता लाभलीतर अनेक भेदांच्या भिंती आपोआपच कोसळतील.. इथे माणूस रंगाने नव्हे, तर विचारांनी माणूस मोठा व्हायला हवाय.
गुलाबी रंग हा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि कोमल भावनांचा आहे. गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नात्यांमध्ये मृदुता असावी. पण अनेकदा प्रेमापेक्षा त्याचे प्रदर्शन अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. एखाद्याने आपल्या छायाचित्राला पसंती दिली नाही, कौतुक केले नाही किंवा आपल्या पोशाखाची दखल घेतली नाही, तर मन खिन्न व उदास होते. अशी आपल्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांकडे आपण का द्यावी..? म्हणून स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करणे आणि इतरांना मनापासून जपणेयातच गुलाबी रंगाची खरी कोमलता दडलेली आहे.
जांभळा रंग हा प्रतिष्ठा व आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. पण हल्ली प्रतिष्ठा ही महागड्या वस्त्रांनी किंवा दागिन्यांनी मिळविण्याची स्पर्धा आपण करतोय. महागडा मुकुट डोक्यावर असला म्हणून कोणी राजा होत नाही, उलट जबाबदारीने वागणारा आणि लोकांचा विश्वास जिंकणारा माणूस खऱ्या अर्थाने मोठा असतो. बाह्य थाटामाटाने क्षणभर डोळे दिपतीलही; परंतु विनम्रतेने जिंकलेली मने आयुष्यभर साथ देतात. हे आपण समजून घ्यायला हवं.
जीवनातील प्रत्येक प्रसंग काळा किंवा पांढरा नसतो; परिस्थिती समजून घेण्यासाठी विवेक आवश्यक असतो. याची शिकवण समतोल आणि संयमाची आठवण करून देणारा करडा रंग देतो. मात्रसमतोल राखण्याच्या नावाखाली अन्यायाकडे दुर्लक्ष करून चुकीच्या गोष्टीसमोर गप्प बसणे म्हणजे शांतता नव्हे; कधी ते अन्यायाला मिळालेले मूक समर्थनही असू शकते. म्हणूनच संयमासोबत सत्याच्या बाजूने उभे राहण्याचे धैर्यही मोठ्या दिलाने बाळगायला हवे. नवरात्रीत आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो. तिच्या चरणी फुले वाहतो, ओटी भरतो, उपवास करतो आणि देवीपुढे मनोकामनाही व्यक्त करतो. पण देवीचे रूप असलेल्या घरातील स्त्रीचा सन्मान करतो का.? आई, बहीण, पत्नी, मुलगी किंवा सहकारी यांना समानतेची वागणूक देतो का..? त्यांच्या मतांचा आदर करून त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देतो का..? देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होणे सोपे आहे; पण सभोवतालच्या स्त्रीच्या स्वाभिमानाचा आदर करणे ही खरी भक्ती आहे.
देवीच्या हातातील शस्त्रं ही केवळ अलंकार नाहीत; ती दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याच्या सामर्थ्याची प्रतीकं आहेत. मग आपल्या मनातील अहंकार,मत्सर,द्वेष,असूया आणि भेदभाव या प्रवृत्तींवर विजय मिळवणंहीसुद्धा देवीची खरी उपासना नाही का..? मंदिरात जाऊन देवीसमोर नतमस्तक होणं महत्त्वाचंच आहे; पण मंदिराबाहेर गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणं, दुःखी माणसाचं सांत्वन करणं आणि अन्यायग्रस्ताच्या पाठीशी उभं राहणंयातही भक्तीचं पावित्र्य सामावलेलं आहे.
उपवास करणं ही श्रद्धेची बाब आहे. मात्रउपवासाच्या फलाहाराचे पदार्थ शोधताना उपाशी माणसाची आठवण झालीतर त्या श्रद्धेला अधिक अर्थ प्राप्त होईल.उपवासाने शरीराला शिस्त लावता येते; पण मनातील द्वेष, मत्सर आणि अहंकार कमी करण्याचा प्रयत्नही यावेळी व्हायला हवेत. देवीसमोर दिवा लावताना अडचणीत असलेल्या माणसाच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवता येईल का..? आरतीत टाळ्या वाजवताना अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येईल का..? मंदिरात प्रसाद वाटताना गरजू माणसाच्या भुकेची जाणीव ठेवता येईल का..? या प्रश्नांची उत्तरे आपल्या कृतीतून मिळालीतर नवरात्र केवळ धार्मिक विधी न राहता जीवनमूल्यांचा आणि अंतरंग उजळवणारा उत्सव बनेल. नऊ दिवसांत नऊ रंगांच्या साड्या नेसून आपण आरशासमोर उभे राहतो. पण कधीतरी बाह्य आरशापासून दूर जाऊन अंतर्मनाच्या आरशातही डोकावून पाहूया. कारण नवरात्र म्हणजे केवळ देवीला सजवण्याचा उत्सव नाही; तो स्वतःच्या विचारांना घडवण्याचाही उत्सव आहे. साडीच्या पदराला सद्गुणांची किनारही असावी, विवेकाला दागिन्यांची झळाळी असावी. चेहऱ्यावरील हास्यासोबत दुसऱ्याच्या अश्रूंकडे पाहण्याची संवेदना असावी. नवरात्रीचे नऊ रंग आपण केवळ साड्यांमध्ये मिरवण्याऐवजी जीवनमूल्यांच्या रूपाने जगलोतर या उत्सवाचा अर्थ अधिक समृद्ध होईल. लाल अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, पांढरा सत्यनिष्ठेची शिकवण, पिवळा आशावाद आणि आनंदाची प्रेरणा, हिरवा निसर्गसंवर्धनाची जाणीव, निळा विश्वास आणि जबाबदारीची आठवण,गुलाबी प्रेम आणि सहृदयता, नारिंगी सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा, जांभळा स्वाभिमान व स्त्रीसन्मानाची जाणीव दृढ करेल; तर सोनेरी रंग सदाचार आणि माणुसकीचे तेज आचरणात उतरवण्याची प्रेरणा देईल. हे रंग वस्त्रांवर खुलले तर आपलं रूप खुलून दिसेल; पण हेच रंग विचारांत आणि कृतीत उतरलेतर आपलं जीवन उजळून निघेल.. नवरात्र आपल्याला केवळ देवीची भक्ती करायला शिकवत नाही; तर आपल्यातील माणूस जागा ठेवण्याची आठवणही करून देतं. साडीचा रंग जुळणं सुंदर आहे, पण विचारांचा रंग जुळणं त्याहून सुंदर.! चेहऱ्यावरचं तेज आकर्षक आहे, पण चारित्र्यातलं तेज अधिक मौल्यवान.! चला तर मगयंदाच्या नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्यांसोबत नऊ चांगले संकल्पही मनाशी बांधून श्रद्धेला संवेदनशीलतेची, परंपरेला विवेकाची आणि उत्सवाच्या झगमगाटात माणुसकीचा दिवा तेवत ठेवूया.
- सौ.वनिता वासुदेव तळेकर
अधीक्षक, मुलींचेवसतिगृह,
जे.ई.एस.महाविद्यालय,जालना.