खरा इतिहास लपवल्याने आमचा इतिहास आम्हालाच माहिती नसणे हे दुर्दैव - इतिहास अभ्यासक शिवदास ढोलेकर

उमरद येथे वीर जिवाजी महाले जयंती उत्साहात साजरी; विविध क्षेत्रांतील गुणवंतांसह पत्रकार आनंद राजे जाधव यांचा "आदर्श पत्रकार पुरस्कारा"ने सन्मान!

Jalna Nayak    12-Oct-2026
Total Views |

उमरद येथे वीर जिवाजी महाले जयंती उत्साहात साजरी;
 
 
किनगावराजा - "आपल्या देशाचे हे मोठे दुर्दैव आहे की, ज्यांचा इतिहास सुवर्णअक्षरांनी लिहिण्याजोगा आहे, त्यांनाच आपला खरा इतिहास माहिती नाही. स्वराज्यात स्त्रियांना मिळालेला सर्वोच्च सन्मान हाच खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापनेचा मुख्य पाया होता," असे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास अभ्यासक शिवदास ढोले  यांनी केले. तत्कालीन पांढरपेशा इतिहासकारांनी जाणीवपूर्वक खरा इतिहास लपवून ठेवल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
उमरद येथे शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ते मुख्य व्याख्याते म्हणून बोलत होते. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त तथा म.रा. नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दामोधर बिडवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरदच्या सरपंच सौ. निर्मला पंढरीनाथ उबाळे या होत्या.
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात ढोलेकरांनी शिवकालीन अनेक ऐतिहासिक प्रसंगांना उजाळा दिला. अफजलखानाच्या वधाच्या वेळचा रोमांचक प्रसंग सांगताना ते म्हणाले, "अफजलखान स्वारीच्या वेळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या १० मुख्य अंगरक्षकांची निवड केली, तेव्हा सुरुवातीला त्या यादीत जिवाजी महाले यांचे नाव नव्हते. आपले नाव यादीत नसल्याचे पाहून जिवाजींच्या मनात अतीव दुःख झाले होते. मात्र, महाराजांनी तात्क्षणीय त्यांची मनःस्थिती ओळखली आणि त्यांना जवळ बोलावून सांगितले, 'जिवाजीराव, तुम्ही फक्त सय्यद बंडा याच्यावर लक्ष ठेवायचे!' हे ऐकताच जिवाजी महालेंचा चेहरा अभिमानाने फुलला. त्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी जो इतिहास घडला, तो जिवाजींच्या अचाट धाडसाची कायमची ओळख बनला."
देवगिरीच्या यादवांच्या काळातील 'खंडागळे हत्ती प्रकरणाचा' विशेष दाखला दिला. जाधव आणि भोसले या दोन बलाढ्य घराण्यांमधील रक्तरंजित वादाचा संदर्भ देत त्यांनी, "आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांना मारले," असाही एक वेदनादायी इतिहास आपल्या भूमीत घडल्याचे प्रा. ढोलेकर यांनी सांगितले. या अंतर्गत वादामुळे राजमाता जिजाऊ यांच्या मनाची झालेली प्रचंड घालमेल आणि दुःख त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडले. परंतु, या दुःखातून आणि संघर्षातूनच पुढे स्वराज्याची ठिणगी पडली आणि शिवरायांच्या संस्कारांची पेरणी झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव आणि 'आदर्श पत्रकार' पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये परिसरातील वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, अध्यात्मिक, देशसेवा, शौर्य, गायन कला आणि उत्कृष्ट व्याख्याते अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दामोधर बिडवे, डॉ. शिवानंदजी जायभाये, डॉ. ज्ञानेश्वर नागरे, शितल दराडे, प्रा. मधुकर जाधव, मा.कु. वैष्णवी डोईफोडे, ह.भ.प. पांडुरंग महाराज केदार, विठ्ठल जाधव, विनोद सातपुते, श्रीमंत पाडव, गोविंद मुळे, प्रकाश शिवहरी मुंडे, शिवदास भिमराव चाटे आणि सौ. त्रिशिला उबाळे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

स्थानिक पत्रकार आनंद राजे जाधव यांना या भव्य कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
 गेल्या १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अविरत आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे स्थानिक पत्रकार आनंद राजे जाधव यांना या भव्य कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 'आदर्श पत्रकार पुरस्कार' देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या गौरव बद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या  सोहळ्याचे आयोजन म.रा. नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर संतराम वखरे, जिवाजी महाले जयंती उत्सव समिती, उमरद ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. आर. आर. डोईफोडे, प्रास्ताविक प्रभाकर वखरे व आभार प्रदर्शन माजी सरपंच संतोष गिरी यांनी  केले.कार्यक्रमाला उमरद परिसरातील नागरिक, इतिहासप्रेमी आणि महिलांची मोठी उपस्थिती  होती.