पायाला फ्रॅक्चर, पण शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व्हीलचेअरवरून मंत्रालयाची वारी; आमदार अर्जुनराव खोतकरांच्या पाठपुराव्याला यश!

१८ गावांतील दीड हजार शेतकरी कुटुंबांच्या कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय; २२ कोटींचा प्रश्न अडीच कोटींच्या तडजोडीतून मार्गी

Jalna Nayak    13-Oct-2026
Total Views |

पायाला फ्रॅक्चर असतानाही व्हीलचेअरवरून थेट मंत्रालयात
 
जालना: शरीराला झालेल्या असह्य वेदनांपेक्षा बळीराजाचे दुःख मोठे असते, याची जाणीव जपत आणि पायाला फ्रॅक्चर असतानाही व्हीलचेअरवरून थेट मंत्रालयात धाव घेत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रामनगर येथील युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेशी संबंधित १८ गावांतील तब्बल १,५०० शेतकरी कुटुंबांना वर्षानुवर्षांच्या कर्जाच्या विळख्यातून मुक्त करणारा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सुमारे २२ कोटी रुपयांचा दीर्घमुदतीचा कर्जप्रश्न अवघ्या २.५ कोटींच्या एकरकमी तडजोडीतून (ओटीएस) निकाली काढण्यात आला असून, ही संपूर्ण रक्कम शासनच भरणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
 या शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणाचा 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने'त समावेश करून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती, तारणात अडकलेल्या जमिनी आणि नव्या कर्जासाठी येणाऱ्या अडचणी शासन व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या.
या बैठकीतील खोतकरांच्या उपस्थितीने त्यांच्या सर्वसामान्यांबद्दलच्या आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या दृढ संवेदनशीलतेची साक्ष दिली. अलीकडेच झालेल्या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना एक ते दीड महिना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. असे असतानाही, स्वतःच्या शारीरिक वेदना बाजूला सारून अवघ्या आठ दिवसांत ते थेट व्हीलचेअरवरून मंत्रालयात पोहोचले. आपल्या वैयक्तिक प्रकृतीच्या अडचणींपेक्षा त्यांनी दीड हजार शेतकरी कुटुंबांच्या उज्ज्वल भविष्याला आणि त्यांच्या हक्काला सर्वोच्च प्राधान्य दिले.
रामनगर परिसरातील या शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जासाठी तारण असल्यामुळे त्यांना इतर बँकांकडून कर्ज मिळण्यात मोठे अडथळे निर्माण होत होते. शेतीसाठी आवश्यक भांडवलाचा मार्ग अडल्याने अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे हलाखीत जीवन जगत होती. कर्ज फेडीची चिंता आणि आगामी हंगामासाठी पैसा उभा करण्याची धडपड, अशा दुहेरी कात्रीत सापडून शेतकरी हतबल झाले होते. ही भीषण परिस्थिती जवळून अनुभवत आमदार खोतकरांनी संबंधित यंत्रणांना एकाच व्यासपीठावर आणून हा प्रश्न मार्गी लावला.
शासनाकडून तडजोडीची रक्कम जमा झाल्यानंतर आणि बँकेची आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्जखाती पूर्णपणे बंद होऊन जमिनींवरील तारण व बोजा मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे पात्रतेनुसार शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज व इतर शेतीकर्ज मिळणे सुलभ होईल. हा निर्णय केवळ कागदावरचा हिशेब मिटवणारा नाही, तर तो दीड हजार कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण घेऊन आला आहे. अनेक वर्षांच्या कर्जाच्या विळख्यातून मुक्त झालेल्या या शेतकऱ्यांना अब आपल्या जमिनीवर नव्या उमेदीने शेती करता येणार असून, हा कर्जमुक्तीचा मार्ग या कुटुंबांची आगामी दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करणारा ठरणार आहे. या महत्त्वाच्या बैठकीस सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी आणि कर्जदार शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभाग घेतला. तसेच जिल्हा उपनिबंधक विष्णू रोडगे, अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, युनियन बँकेचे गौरव सोनवणे, रामनगर शाखेचे संबंधित अधिकारी, कृषी अधिकारी रवि शिंदे, संस्थेचे चेअरमन तुकाराम शेजुळ, व्हाईस चेअरमन संजय शेजुळ, व्यवस्थापक संदीप शेजुळ, नगरसेविका दर्शना खोतकर झोल यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी म्हणून मुरली आबा थेटे, नरसिंग गोरे, बापूराव जाधव, पांडुरंग डोंगरे, रवी गोरे, नारायण गोरे, विष्णू पाचफुले, संतोष रासवे, मेघराज चौधरी, आपासाहेब डोंगरे, भाऊसाहेब गोरे, शिवाजी गोरे आणि एकनाथ गोरे यांनी सहभाग नोंदवला.