दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार रुपये जमा होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अग्रीम आर्थिक मदत; मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णयाची माहिती

Jalna Nayak    14-Oct-2026
Total Views |

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
 
 
मुंबई- महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यावर अग्रीम म्हणून पाच हजार रुपये तातडीने जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाकडून विविध दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या सवलती टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, दिवाळीचा सण जवळ आल्याने शेतकऱ्यांना सणासुदीच्या खर्चासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीतून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम तातडीने जमा होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीबरोबरच आगामी काळात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन शासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. पाच हजार रुपयांच्या मदतीसाठी पात्र शेतकरी कोण असतील, मदतीचे वितरण कोणत्या निकषांनुसार होईल आणि प्रत्यक्ष पैसे जमा होण्याची तारीख काय असेल, याबाबत अधिकृत तपशील उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना नेमकी माहिती मिळू शकेल.