भोकरदन-जाफराबादसह जालना जिल्ह्यातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांना मताधिक्य देणार – माजी आमदार चंद्रकांत दानवे
पदवीधर आणि जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दर महिन्याला एक दिवस जालना जिल्ह्यासाठी देणार – डॉ. प्रतापसिंह पाटील
भोकरदन: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या भोकरदन येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच पदवीधर मतदारांच्या आढावा बैठकीचे आयोजन माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले. या बैठकीत पदवीधर मतदारांशी संवाद साधत आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री राजेश टोपे यांनी विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “सतीश चव्हाण यांनी निवडणुकीनंतर मतदारसंघात पाय ठेवला नाही. पदवीधर मतदारांचे प्रश्न सोडविण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत,” अशी टीका त्यांनी केली. पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने उपलब्ध राहणारे नेतृत्व निवडून देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार चंद्रकांत दानवे म्हणाले की, भोकरदन-जाफराबादसह संपूर्ण जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून डॉ. प्रतापसिंह पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील अडचणी तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पदवीधर मतदारांशी संवाद साधताना सांगितले की, “पदवीधरांचे तसेच जालना जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रत्येक महिन्यातून एक दिवस जालना जिल्ह्यासाठी देणार आहे.” पदवीधरांच्या समस्या समजून घेऊन त्या शासनदरबारी मांडणे, त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, ही आपली प्राथमिकता असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भोकरदन येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे महाविकास आघाडीच्या प्रचाराला गती मिळणार असून, भोकरदन-जाफराबाद तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रचार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तर सुधाकर दानवे यांनी सर्व जाती धर्मांना घेऊन चालणाऱ्या डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या नावासमोर पहिल्या पसंतीचा एक क्रमांक देऊन मोठे मताधिक्य द्यावे असे आवाहन केले.
यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, माजी मंत्री राजेश भैय्या टोपे, मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे, जिल्हाध्यक्ष संजय काळबांडे, युवानेते सुधाकर आण्णा दानवे, सुरेखाताई लहाने, रमेश शेठ सपकाळ, रामधन पाटील कळंबे, प्रा. डॉ. अंकुश जाधव, कैलासराव पुंगळे, राजेंद्र दसपुते, लक्ष्मण ठोंबरे, प्रा विजय सुरासे, ज्ञानेश्वर चव्हाण, शफिक शेख, इस्रारखा पठाण, शब्बीर कुरेशी, नसीम पठाण, कदीर बापू, चंद्रकांत पगारे, अशोक पवार, प्रा. संग्रामराजे देशमुख, महेश औटी, नितीन शिवनकर, साबेत चाऊस, मुजीब सर, वसीम मिर्झा, रहमान भाई, रघुनाथ पंडित, पंडीतराव इंगळे सर, सुभाषराव जगताप, अनिल देशपांडे, वसीम मिर्झा, रगडे साहेब, राजू जाधव, गंगाधर कांबळे, रामदास रोडे, रघुनाथ पंडित, रामेश्वर जंजाळ, भगवान ठोंबरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.