डोंगरमाथ्यावर कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!

टिटवी-वाढोणा गडावर नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा; नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

Jalna Nayak    15-Oct-2026
Total Views |
 
वाढोणा गडावरील कालिका देवी संस्थानात शारदीय नवरात्रोत्सव
 
वालसावंगी (प्रतिनिधी) : भोकरदन आणि सोयगाव तालुक्यांच्या सीमेवरील डोंगरमाथ्यावर वसलेल्या टिटवी-वाढोणा गडावरील कालिका देवी संस्थानात शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेल्या या देवीच्या दर्शनासाठी मराठवाडा, खानदेश, विदर्भासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
टिटवी-वाढोणा गडावरील कालिका देवीचे मंदिर डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. मंदिराचा काही परिसर भोकरदन तालुक्यातील वाढोणा गावाच्या हद्दीत, तर काही परिसर सोयगाव तालुक्यातील टिटवी गावाच्या हद्दीत येतो. त्यामुळे हे देवस्थान टिटवी-वाढोणा गडावरील कालिका देवी संस्थान म्हणून ओळखले जाते.
उंच डोंगरावरून दिसणारे विहंगम दृश्य आणि परिसरातील नैसर्गिक सौंदर्य यामुळे हे ठिकाण भाविकांसह पर्यटकांनाही आकर्षित करते. देवीवरील श्रद्धेमुळे नवरात्रोत्सवात विशेषतः महिला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. दररोज सकाळपासूनच भाविक मंदिरात दाखल होत असून, देवीच्या दर्शनासाठी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
 
वाढोणा गडावरील कालिका देवी संस्थानात शारदीय नवरात्रोत्सव
 
फराळ आणि पाण्याची व्यवस्था
नवरात्रोत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संस्थानच्या वतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. नऊही दिवस भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कालिका देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ. अरुण पोफळे, उपाध्यक्ष कैलास अक्कर आणि सचिव प्रकाश अनवेकर यांनी केले आहे.