जालना शहरातील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित; FDA ची कठोर कारवाई

अन्न सुरक्षा निकषांचे केवळ ६३ टक्के पालन; शाकाहारी-मांसाहारी पिझ्झा एकाच ओव्हनमध्ये तयार केल्यासह अनेक गंभीर त्रुटी उघड

Jalna Nayak    15-Oct-2026
Total Views |
 
जालना शहरातील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित
 
जालना- जालना शहरातील प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झा आउटलेटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली असून, संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या अचानक तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
 
मे. ज्युबिलंट फुड वर्क्स लिमिटेडच्या मालकीच्या या डॉमिनोज पिझ्झा आउटलेटची तपासणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अ. ए. तांबे यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा निकषांचे केवळ ६३ टक्के पालन होत असल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अनुज्ञप्ती प्राधिकारी तथा सहायक आयुक्त श्री. नि. सु. कुलकर्णी यांनी संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.
 
शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झा एकाच ओव्हनमध्ये
तपासणीदरम्यान शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झा तयार करण्यासाठी एकाच ओव्हनचा आणि पॅनचा वापर केला जात असल्याचे आढळल्याचे संबंधित माहितीपत्रकात नमूद आहे. याशिवाय अन्नपदार्थ गरम किंवा थंड ठेवण्यासाठी तसेच आवश्यक तापमान नियंत्रणासाठी पुरेशा सुविधा नसल्याची बाबही समोर आली. अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळणे आणि शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची हाताळणी योग्य पद्धतीने करणे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने प्रशासनाने संबंधित आस्थापनेविरोधात कारवाई केली आहे.
 
कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेसह साठवण आणि कचरा व्यवस्थापनात त्रुटी
तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांकडून आवश्यक स्वच्छतेच्या साधनांचा वापर होत नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांकडे एप्रन, हातमोजे आणि डोक्याचे संरक्षण करणारी साधने नसल्याचे नमूद करण्यात आले.
तसेच, डिलिव्हरीसाठी वापरण्यात येणाऱ्या दुचाकींवरील बॉक्सवर आवश्यक अन्न परवाना क्रमांक नमूद नसणे आणि त्या बॉक्सच्या स्वच्छतेबाबत त्रुटी आढळणे, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची नियमित पडताळणी न करणे, कचरा वेळेवर न हटवणे आणि अन्न हाताळणीच्या परिसरात पाणी साचून राहणे, अशा बाबीही तपासणीत समोर आल्या.
अन्नपदार्थ तयार करण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता राखणे आवश्यक असते. त्यामुळे या त्रुटींकडे प्रशासनाने गंभीरतेने पाहिले आहे.
 
परवाना निलंबित; अन्नविक्रीवर बंदी
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निलंबनाच्या कालावधीत संबंधित आउटलेटमधून कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण किंवा विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. निलंबन आदेशाचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.या आस्थापनेचा परवाना पुन्हा सुरू करण्याबाबत किंवा निलंबन उठविण्याबाबत पुढील आदेश काय असतील, याकडे लक्ष लागले आहे.
 
ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नको
अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, योग्य तापमान नियंत्रण आणि सुरक्षित हाताळणी या बाबी अन्न व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाई केली जात आहे.अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करू नये, असे आवाहन सह आयुक्त  श्रीकांत करकळे यांनी केल्याचे संबंधित माहितीपत्रकात नमूद आहे.