भोकरदन : हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यात भोकरदन पोलिसांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करत पोलिसांनी विविध कंपन्यांचे एकूण एक लाख ४० हजार रुपये किमतीचे मोबाईल शोधून काढले. गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी हे मोबाईल संबंधित नागरिकांच्या सुपूर्द करण्यात आले. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भोकरदन पोलिसांनी संबंधित मोबाईलचे आयएमईआय (IMEI) क्रमांक CEIR पोर्टलवर नोंदवून आवश्यक कार्यवाही केली. या प्रक्रियेद्वारे मोबाईलचा वापर आणि त्यासंबंधी उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात आला. सायबर तांत्रिक विश्लेषण आणि पोलीस पथकाच्या प्रयत्नांतून हे मोबाईल महाराष्ट्रातील विविध भागांतून शोधण्यात आले. त्यानंतर आवश्यक पडताळणी करून ते मूळ मालकांना परत देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भोकरदन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने तसेच पोलीस अंमलदार इंदल बमनावत, दीपक इंगळे आणि प्रदीप टेकाळे यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.
मोबाईल हरवल्यास त्वरित तक्रार करा
मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलवर (ceir.sanchaar.gov.in) आवश्यक माहिती भरून मोबाईल ब्लॉक करण्यासाठी अर्ज करावा. जुन्या अथवा सेकंडहँड मोबाईलची खरेदी करताना त्याची पावती, विक्रेत्याची माहिती आणि आयएमईआय क्रमांकाची पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.