वालसावंगी:भोकरदन तालुक्यातील कोपर्डा शिवारात शेतामध्ये गांजाची लागवड केल्याच्या प्रकरणात भोकरदन पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत गांजाची दोन ओलसर झाडे, तसेच मातीचे नमुने जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या मुद्देमालाची नमूद किंमत ३ लाख ६१ हजार रुपये आहे. याप्रकरणी कोपर्डा येथील मधुकर किसन पाबळे (वय ४२) याच्याविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.२५ वाजण्याच्या सुमारास कोपर्डा शिवारातील गट क्रमांक १०१ मधील शेतात ही कारवाई करण्यात आली. संबंधित शेतात गांजाच्या झाडांची लागवड व संगोपन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कारवाईदरम्यान एकूण ७.२२० किलो वजनाची गांजाची दोन ओलसर झाडे जप्त करण्यात आली. याशिवाय गांजाच्या झाडांजवळील ओलसर माती आणि लागवड केलेल्या शेतातील मातीचे नमुनेही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दशरथ शेळके यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६३/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम २०(ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने करीत आहेत.