जालना येथील महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टला 3 हेक्टर जागा डोळ्यांचेच नव्हे, तर गंभीर आजारांचे उपचार आणि वैद्यकीय शिक्षण उपलब्ध होणार

कर्करोग, हृदयरोगांसह मोठ्या आजारांवर उपचार

Jalna Nayak    16-Oct-2026
Total Views |
 
जालना येथील महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टला 3 हेक्टर जागा
 
 
जालना : येथील 'महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्ट'च्या नेत्रालयाला लागून असलेल्या ३ हेक्टर शासकीय जमिनीवर आता केवळ डोळ्यांचेच नव्हे, तर इतर अनेक गंभीर आजारांचे उपचार आणि वैद्यकीय शिक्षण उपलब्ध होणार आहे. मूळ नेत्रालयाच्या सेवेला कोणताही धक्का न लावता, या जागेवर वाढीव वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा सुरू करण्यास फडणवीस सरकारने विशेष अटींवर परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे मराठवाड्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आता या ठिकाणी औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) सोडून जनरल मेडिसीन, डायलेसिस, हाडांचे आजार (ऑर्थोपेडिक), कान-नाक-घसा (ENT), बालरोग, हृदयरोग, मेंदूविकार, रक्ताचे आजार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध होतील. यासोबतच नर्सिंग कॉलेज, ऑप्टोमेट्री कॉलेज, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आणि अनेस्थेशिया असिस्टंट यांसारखे वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणाचे अभ्यासक्रमही येथे सुरू करता येतील. मात्र, हे सर्व अभ्यासक्रम केवळ संस्थेत प्रत्यक्ष दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांशीच संबंधित असणे बंधनकारक असेल. कोणताही नवीन शैक्षणिक कोर्स सुरू करण्यापूर्वी तो रुग्णालयाच्या प्रत्यक्ष सेवेशी जोडलेला आहे की नाही, याची खात्री जालना जिल्हाधिकाऱ्यांकडून करून घ्यावी लागेल.
 
या जागेचा आणि सुविधांचा वापर निव्वळ सार्वजनिक हितासाठी आणि ना-नफा तत्त्वावरच करावा लागेल. रुग्णांना आणि सर्वसामान्यांना सवलतीच्या व अत्यंत परवडणाऱ्या दरात औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स आणि वैद्यकीय साहित्य मिळावे यासाठी शासनाच्या योजनेनुसार 'जनऔषधी केंद्र' किंवा ना-नफा तत्त्वावरील औषध विक्री केंद्र सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.
या संपूर्ण योजनेवर जालना जिल्हाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लक्ष ठेवणार आहेत. या मंजुरीमुळे जमिनीचे क्षेत्रफळ वाढणार नाही, जमिनीची मालकी बदलणार नाही किंवा जुन्या नियमांमध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. तसेच अटींचा भंग झाल्यास शासन योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकते."आरोग्य हीच खरी ईश्वरसेवा आहे. कर्करोग, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी गोरगरिबांना पैशांअभावी किंवा उपचारासाठी दूरवर भटकंती करावी लागणे अत्यंत वेदनादायी असते. जालन्यातील या प्रकल्पामुळे आता सर्वसामान्य जनतेला त्यांच्याच भागात अत्यंत माफक आणि परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळतील.- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री