मावळ व इतर भागातील गवत दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा; अर्जुन खोतकर यांचा शासनाकडे प्रस्ताव

गवत कापणीतून मजुरांना रोजगार,

Jalna Nayak    17-Oct-2026
Total Views |
 
शेतकरीहिताचा प्रस्ताव आमदार अर्जुनराव खोतकर यांनी राज्य शासनासमोर मांडला
 
 वनमंत्री गणेश नाईक व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्याशी सविस्तर सकारात्मक चर्चा; मजुरांना रोजगार आणि चाराटंचाईतील शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी

जालना : एका भागातील गवत वणव्यात जळून जाण्याऐवजी ते चाराटंचाई असलेल्या भागातील जनावरांच्या उपयोगी यावे आणि गवत कापणीच्या कामातून ग्रामीण मजुरांनाही रोजगार मिळावा, असा शेतकरीहिताचा प्रस्ताव आमदार अर्जुनराव खोतकर यांनी राज्य शासनासमोर मांडला आहे. मावळसह राज्यातील योग्य क्षेत्रांत उपलब्ध असलेले अतिरिक्त पशुखाद्ययोग्य गवत नियोजित पद्धतीने कापून जालना व अन्य चाराटंचाईग्रस्त भागांना पुरविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रस्तावाबाबत आमदार खोतकर यांनी वनमंत्री गणेश नाईक आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्याशी प्रत्यक्ष दूरध्वनीवरून सखोल व सविस्तर चर्चा केली. उपलब्ध गवताचा उपयोग, मजुरांना रोजगार आणि गरजू भागांपर्यंत चारा पोहोचविण्यासाठी विभागांच्या समन्वयाबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांना निवेदन देण्यात आले आहे.
“एका भागात गवत जळून जावे आणि दुसऱ्या भागात चाऱ्याअभावी शेतकऱ्यावर जनावरे विकण्याची वेळ यावी, ही परिस्थिती योग्य नियोजनातून टाळता येऊ शकते,” अशी भूमिका खोतकर यांनी निवेदनातून मांडली आहे. अधिक पाऊस पडणाऱ्या भागांत हंगामानंतर उपलब्ध होणाऱ्या गवताचे सर्वेक्षण करावे. स्थानिक पशुपालक, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या गरजा भागवून उरणारे योग्य गवतच गरजू भागांना द्यावे, असे त्यांनी सुचविले आहे.
या मोहिमेत रोजगार हमी योजनेच्या नियमांत बसणाऱ्या कामांतून स्थानिक मजुरांच्या हाताला काम द्यावे. गवत कापणी, संकलन, गाठी बांधणी आणि वाहतूक यांपैकी योजनेत मान्य नसलेल्या खर्चासाठी शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा. निधी व विभागीय समन्वयाअभावी तातडीचा चारा पुरवठा रखडू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.