जायकवाडीच्या पाण्यावरून शेतकरी आणि सरकारमध्ये संघर्ष पेटणार;शेतकऱ्यांच्या कृषी पंपांवरील कारवाईवरून घाटगे पाटील आक्रमक

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

Jalna Nayak    18-Oct-2026
Total Views |

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांवरील कारवाईवरून घाटगे पाटील आक्रमक
 
जालना: मराठवाड्यात तीव्र ऑक्टोबर हीटमुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून, उभी पिके वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांशी आता प्रशासनाचा थेट संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. गोदावरी नदी पात्रातील बंधाऱ्यांमधून शेतीसाठी होणारा पाण्याचा उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कृषी पंप हटवण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर गोदाकाठच्या खासगी विहिरी आणि बोअरवेलही पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
 
भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने ऑक्टोबर २०२७ पर्यंतचे नियोजन करत शेती सिंचनावर कडक निर्बंध लादले आहेत. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गोदावरी पात्रातील बंधाऱ्यांवर ही कारवाई सुरू आहे. दुसरीकडे जायकवाडी धरणात तब्बल ७८ टक्के साठा उपलब्ध असतानाही रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने पिके डोळ्यांदेखत करपून जात आहेत.
या पार्श्वभूमीवर समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मराठवाड्याच्या पाण्याबाबत राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप करत, त्यांनी या प्रकाराविरोधात जनउद्रेकाचा इशारा दिला आहे. "लाखो रुपये खर्चून उभी केलेली पिके वाचवायची कशी?" असा उद्विग्न सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
बंधाऱ्यांवरील कारवाई तात्काळ थांबवून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन त्वरित घोषित करावे; अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह थेट जायकवाडी धरणावर धडक मारण्याचा थेट इशारा घाटगे पाटील यांनी दिला आहे. यामुळे येत्या दिवसांत मराठवाड्यात पाण्याचा हा प्रश्न अत्यंत पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात खुलेआम पाणी उपसा सुरू आहे. मात्र मराठवाड्यात यांना वाळवंट होऊ द्यायचे आहे. जायकवाडी धरणात ७८ टक्के पाणी असताना ही दुटप्पी भूमिका कशासाठी? मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा करोडो रुपयांचा ऊस जळताना आम्ही शांत बसणार नाही; सरकारने तातडीने ४ आवर्तने घोषित करावीत, सध्या सुरू असलेली कृषी पंपांवरील कारवाई थांबवावी; अन्यथा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सरकारला सामोरे जावे लागेल.
— सतीश घाटगे पाटील, चेअरमन, समृद्धी साखर कारखाना