वाहनाला वाचवण्याचा प्रयत्न कारचा भीषण अपघात, वैष्णवी घुगेचा मृत्यू
मेंडगाव येथील देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना झालेल्या कार अपघात
Jalna Nayak 18-Oct-2026
Total Views |
देऊळगाव राजा:- नवरात्र उत्सवानिमित्त मेंडगाव येथील देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना झालेल्या कार अपघातात वैष्णवी बद्रीनाथ घुगे वय २४ वर्षे या तरुणीचा मृत्यू झाला. सदर घटना देऊळगाव राजा शहरातील उंबरखेड फाट्याजवळ असलेल्या पद्मबुद्धी पेट्रोल पंपासमोर रविवारी दुपारी बारा वाजता घडली.
देऊळगाव राजा शहरात भगवान बाबा नगर मध्ये शिक्षक बद्रीनाथ घुगे राहतात. शनिवारी रात्री स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच २८ बीके ८७१८ या कारने परिवारासह त्यांच्या मूळ गावी मेंडगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी परिवारासह गेले होते. रविवारी सकाळी देवीचे दर्शन आटोपून ते कारने देऊळगाव राजासाठी परत निघाले. कुंभारी चौफुली क्रॉस करून घर दोन मिनिटांच्या अंतरावर असतानाच पद्मबुद्धी पेट्रोल पंपासमोर वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार अनियंत्रित होऊन स्ट्रीट लाईटच्या खांबाला जोरदार धडक बसली. आणि रस्त्यावरच पलटी झाली. या अपघातात कार मधील सर्वजण गंभीर जखमी झाले. वैष्णवी बद्रीनाथ घुगे हिच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला.अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ सर्व जखमींना कारच्या बाहेर काढून देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती वैष्णवी घुगे हिला मृत घोषित केले. इतर जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे तातडीने हलवण्यात आले. मृत वैष्णवी घुगे हिचे एमबीएपर्यंतचे शिक्षण झाले असून ती सोमवारी पुणे येथे नोकरीसाठी रुजू होणार होती. म्हणून घुगे परिवार नवरात्र उत्सवानिमित्त शनिवारी रात्री त्यांच्या मूळ गावी मेंडगाव येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. आणि रविवारी रात्री वैष्णवी पुण्याला रवाना होणार होती.मात्र त्यापूर्वीच झालेल्या दुर्दैवी अपघातात काळाने डाव साधला. आणि नोकरीवर रुजू होण्यापूर्वीच या दुर्दैवी अपघातात वैष्णवीचा मृत्यू झाला. वैष्णवीच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ असा परिवार आहे वैष्णवीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी रात्री देऊळगाव राजा येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात वैष्णवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. या संदर्भात पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करत आहेत.