जालना: जालना शहरातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या सोडविण्यासह शहरातील विद्युत यंत्रणा अधिक सुरक्षित व सक्षम करण्यासाठी किमान २५ नवीन वितरण रोहित्रे मंजूर करावीत, अशी मागणी भाजपा-जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी राज्याच्या ऊर्जाराज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जालना शहरातील विविध भागांत रस्त्यांच्या मधोमध असलेले विद्युत खांब, वाकलेले व जीर्ण खांब, लोंबकळणाऱ्या वीजतारा तसेच कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्यांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी दानवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जालना शहराची वाढती लोकसंख्या, नवीन वसाहतींचा विस्तार आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्याच्या वितरण यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत आहे. काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होणे आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरातील गरजेनुसार किमान २५ नवीन वितरण रोहित्रे मंजूर करून बसविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, शाळा, रुग्णालये, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणचे कामे तात्काळ पूर्ण करावीत, असेही भास्कर दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहे.